अवनीश मिश्रा
गढवाल : उत्तराखंडमधील पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील गढवाल हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये दोन वेळचा अपवाद वगळता येथील मतदारांनी सातत्याने भाजपच्या उमेदवारावर विश्वास टाकला आहे. यंदा भाजपने राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलुनी यांना उमेदवारी दिली आहे. ‘‘ही निवडणूक पंतप्रधान निवडण्यासाठी आहे, नरेंद्र मोदींना मत देण्यासाठी आहे हे लोकांना माहीत आहे’’, असे बलुनी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
उत्तराखंडमधील सर्व जागा भाजप जिंकणार आहे. उत्तराखंडमध्ये आम्ही म्हणत आहोत, ‘अब की बार २५ लाख पार’, याचा अर्थ आम्ही पाचही मतदारसंघांमध्ये प्रत्येकी पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकणार आहोत.
प्रश्न : तुम्ही गढवालमध्ये अनेक दिवसांपासून प्रचार करत आहात. तुमचा अनुभव कसा राहिला आहे?
उत्तर : ही निवडणूक माझ्या आयुष्यातील इतर कोणत्याही निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. अगदी लहान मुलेही उत्साहाने ‘अब की बार ४०० पार’ आणि ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा घोषणा देत आमच्या झेंडयामागे येतात. यामुळे आमचा प्रचंड विजय होणार हे दिसते. आम्ही उत्तराखंडमधील सर्व जागा जिंकणार आहोत. राष्ट्रीय पातळीवर आम्ही ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. उत्तराखंडमध्ये आम्ही म्हणत आहोत, ‘अब की बार २५ लाख पार’, याचा अर्थ आम्ही पाचही मतदारसंघांमध्ये प्रत्येकी पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकणार आहोत.
हेही वाचा >>> Election 2024: राजकीय पक्षांसाठी काम करणारे पगारी कार्यकर्ते
प्रश्न : तुमच्या प्रचारात मुख्य मुद्दे कोणते आहेत?
उत्तर : सर्वात आधी, लोकांना हे माहीत आहे की ही निवडणूक पंतप्रधान निवडण्यासाठी आहे, नरेंद्र मोदी यांना मत देण्यासाठी आहे. माझ्या प्रचारात सातत्याने सकारात्मक मुद्दे ठेवले आहेत. गेल्या दशकभरात सरकारची कामगिरी, कोविड-१९ महासाथीदरम्यान इतर देशांना मोफत लस देण्यात अडचणी आल्या तेव्हा मोदींनी त्याचे वितरण होईल याची खबरदारी घेतली. ८० कोटी लोकांना मोफत धान्य, प्रत्येकाकडे आयुष्यमान कार्ड, किसान सम्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ, चार कोटीपेक्षा जास्त लोकांना घरे, याच्या जोडीला लखपती दीदी आणि ड्रोन दीदी हे मुद्दे आहेत.
प्रश्न : गढवालमध्ये अलीकडे जोशीमठात जमीन खचण्यासारखी पर्यावरणीय आव्हाने उभी राहिली आहेत. तुम्ही निवडून आलात तर ही समस्या कशी सोडवाल?
उत्तर : हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये पर्यावरणाच्या समस्या खरोखर गंभीर आहेत. अशा घटना पूर्णपणे थांबवणे आव्हानात्मक असू शकते. मात्र, आम्ही याचे परिणाम कमीत कमी राहतील यासाठी आणि प्रभावक्षेत्रातील लोकांचे कमीत कमी व्यत्यय येईल अशा प्रकारे सुलभ विस्थापन करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
प्रश्न : अंकिता भंडारी हत्या प्रकरणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मुद्दयावरून काँग्रेस भाजपला लक्ष्य करत आहे. तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता?
उत्तर : काँग्रेस विकासावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे हे उघड आहे. अंकिता भंडारी ही उत्तराखंडची कन्या होती आणि तिच्यावर झालेल्या कोणत्याही अन्यायाबद्दल आम्हाला चिंता वाटते. उत्तराखंडच्या जनतेवर देशात कुठेही अत्याचार झाल्यावर मी त्याबद्दल बोललो आहे. आम्ही या प्रकरणात सतर्क आहोत आणि कोणतेही गैरकृत्य झाल्याचे आढळल्यास, न्याय मागण्यासाठी मी सर्वात पुढे असेन.