पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा भाजपाला मोठा झटका बसणार असल्याचे दिसत आहे. कारण, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. एवढच नाही तर या पार्श्वभूमीवर आज ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर, या बैठकीप्रसंगी अभिषेक बॅनर्जी यांची देखील उपस्थिती राहू शकते, असेही सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची सत्ता तिसऱ्यांदा ममता बॅनर्जींच्या हाती आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भाजपावासी झालेले पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे नेते स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यामध्ये मुकुल रॉय, रजीब बंदोपाध्याय यांच्यासह विधानसभेच्या माजी उपाध्यक्षा सोनाली गुहा यांची नावं आघाडीवर आहेत.
BJP National Vice President Mukul Roy is likely to join TMC. The decision regarding his joining will be taken after his meeting with the party’s top brass in Kolkata today: Sources
(file photo) pic.twitter.com/Q26UmmXX1h
— ANI (@ANI) June 11, 2021
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते मुकुल रॉय आणि रजीब बंदोपाध्याय हे राज्यातील निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीला देखील गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर?
मुकुल रॉय हे टीएमसी सोडणारे सर्वात पहिले नेता होते. पक्षविरोधी कारवायाच्या ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी बाहेर केले होते. टीएमसीमध्ये असताना मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी टीएमसी सोडत भाजपात प्रवेश केला होता. १९९८ पासून ते बंगालच्या राजकारणात आहेत.