देशातल्या काही राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या खासदार आणि आमदारकीच्या पोटनिवडणुकांमधील निकालांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसाठीच्या रणनीतीवर देखील चर्चा केली जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काही राज्यांमध्ये भाजपाला फटका बसल्यानंतर पक्षात त्यावर विचारमंथन सुरू झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर २०१९नंतर पहिल्यांदाच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. “आम्ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेत आहोत. यामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीविषयी चर्चा होईल. या बैठकीतील मुद्दे उद्या(शनिवारी) निश्चित केले जातील”, अशी माहिती भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.

या बैठकीमध्ये सुरुवातीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करतील. तर बैठकीच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते दुपारी ३ या काळात ही बैठक होईल. या बैठकीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील भाजपाचे पदाधिकारी, केंद्रीय मंत्री आणि राज्यांमधील प्रमुख नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित राहतील.