हिंदू दहशतवादाचा संघ आणि भाजपशी संबंध जोडल्याबद्दल आज भाजपने गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात देशव्यापी निदर्शने केली. केंद्रीय मंत्रिमंडळातून शिंदे यांना बडतर्फ करेपर्यंत भाजपचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला.
आज जंतरमंतरवर भाजप कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने आंदोलनात भाग घेऊन शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला. शिंदे यांच्या विधानावर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली. शिंदे यांच्या विधानामुळे जगात भारताची नाचक्की झाली आहे. आमचे पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. कुठल्याही घटनेवर प्रतिक्रिया द्यायला त्यांना एक महिना लागतो. त्यामुळे निदान सोनिया गांधी यांनी तरी खुलासा करावा, अशी मागणी राजनाथ स्िंाह यांनी केली. काँग्रेस पक्ष धर्माच्या आधारावर व्होटबँकेचे राजकारण करीत असून या मुद्दय़ावर संसदेत आणि बाहेर भाजप संघर्ष करीत राहील, असे सिंह म्हणाले.
शिंदे यांच्याविरुद्धचे भाजपचे आंदोलन अनुचित आणि अनावश्यक आहे. उलट मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंह ठाकूरचे समर्थन केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी आणि उमा भारती यांनीच माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली. भाजपला शेवटच्या क्षणी अध्यक्ष बदलणे भाग पडले या घटनेवरून जनतेचे लक्ष उडविण्यासाठी हा पक्ष आंदोलन करीत आहे. शिंदे देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते काही तथ्यांच्या आधारेच बोलत असतील. दहशतवादाला कोणताही धर्म वा रंग नसतो, असे काँग्रेसने आधीच स्पष्ट केले आहे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी म्हणाल्या. भाजपपाशी काँग्रेसविरुद्ध कोणताही मुद्दा नसल्यामुळे हा नसलेला मुद्दा उकरून काढण्यात येत आहे, असे पंतप्रधानांच्या कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा