Bihar Poll Prediction News: आज निवडणुका झाल्यास देशात काय चित्र दिसून येईल, यासंदर्भात इंडिया टुडे-सी व्होटर यांनी संयुक्तपणे ‘मू़ड ऑफ द नेशन’ हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार, या निवडणुका झाल्यास देशभरात एनडीएला ३४३ जागा मिळू शकतात, तर भाजपाला २८२ जागांवर विजय मिळू शकतो. त्याचवेळी काँग्रेसला फक्त ७८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यासंदर्भातही या सर्व्हेच्या निष्कर्षांमधून अंदाज वर्तवण्यात आले आहेत. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
काय आहे ‘Mood of The Nation’ मध्ये?
या सर्व्हेच्या निष्कर्षांवरून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार बिहारमध्ये आत्ता विधानसभा निवडणुका झाल्यास भाजपाप्रणीत एनडीएला मोठा विजय मिळू शकतो. इंडिया टुडे-सी व्होटरनं मांडलेल्या निष्कर्षांनुसार एनडीएला बिहारमध्ये ४० जागंपैकी ३३ ते ३५ जागांवर विजय मिळू शकतो. त्याचवेळी दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांच्या महागठबंधन आघाडीला मोठा धक्का बसण्याचा अंदाज आहे. विरोधकांच्या आघाडीला अवघ्या ५ ते ७ जागा मिळतील, असा अंदाज या निष्कर्षांवरून काढण्यात आला आहे.
एनडीएच्या मतटक्क्यांमध्येही वाढ
दरम्यान, एनडीएला मिळू शकणाऱ्या मतांच्या टक्क्यांमध्येही वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार, एनडीएला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये मिळालेल्या ४७ टक्के मतांवरून एनडीएच्या मतांची टक्केवारी थेट ५२ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महागठबंधनला मिळालेल्या मतांचा आकडाही ३९ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर जाऊ शकतो, असा अंदाज या सर्व्हेतून मांडण्यात आला आहे.
हा सर्व्हे २ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या काळात घेण्यात आला होता. यात देशभरातील लोकसभा मतदारसंघांमधून १ लाख २५ हजार १२३ मतदारांनी सहभाग घेतला होता.
NDA एकत्र राहिल्यास पराभव अवघड
एनडीएतील पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिले, तर एनडीएला पराभूत करणं अवघड ठरेल, असा अंदाज सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी वर्तवला आहे. “बिहार हे एक असं राज्य आहे जिथे मतदानाचा कल हा पूर्णपणे आकडेवारीच्या गणितामुळे प्रभावित झालेला असतो. इथे दिल्लीसारखी मतविभागणी होत नाही. जर नितीश कुमार यांची जेडीयू, चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी आणि भारतीय जनता पक्ष एकत्र राहिले, तर महागठबंधनला एनडीएसमोर आव्हान उभं करणं प्रचंड कठीण होऊन बसेल”, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.