कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष, खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणी गुरूवारी ( १५ जून ) पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यानुसार अल्पवयीन तरुणीचं लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा सापडला नाही. त्यामुळे पोक्सोअंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे.
यावरून काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे. “भाजपाचा नवा नारा ‘बेटी डराओ-ब्रिजभूषण बचाओ,'” असं काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच, आरोपपत्रावरून क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना प्रश्न विचारले आहेत.
“पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला तातडीने अटक करण्यात येते. पण, ब्रिजभूषण सिंह माध्यमांना मुलाखती देत पदकांना १५ रुपयांचं सांगतात. दिल्ली पोलीस ४५ दिवस चौकशी करत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तक्रार दाखल होते,” असं सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.
“१५ जूनला आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, याची माहिती क्रीडमंत्र्यांना कशी मिळाली? आरोपपत्र दिल्ली पोलिसांनी तयार केली की भाजपा कार्यालयात तयार करण्यात आलं,” असं सवालही सुप्रिया श्रीनेत यांनी उपस्थित केला.
“एक अल्पवयीन तरुणी ब्रिजभूषण यांच्यासारख्या बलाढ्या नेत्याविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करते. यानंतर पोलीस, सरकार, मंत्री आणि खासदार तरुणीच्या विरोधात उभे राहतात. तर, ब्रिजभूषण सिंह यांना संरक्षण दिलं जातं. आता भाजपाचा नवा नारा ‘बेटी डराओ, ब्रिजभूषण बचाओ,'” असा हल्लाबोल सुप्रिया श्रीनेत यांनी केला.