केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं आहे. आर्थिक सुधारणांसाठी आपण मनमोहन सिंग यांचे ऋणी असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. TIOL पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भारताला गरिबांना फायदा देणाऱ्या उदारमतवादी आर्थिक धोरणाची गरज आहे असल्याचं मत मांडलं.
“उदारमतवादी आर्थिक धोरणामुळे देशाला नवी दिशा मिळाली. यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे,” असं सांगत नितीन गडकरी यांनी कौतुक केलं. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांमुळेच आपण १९९० दरम्यान महाराष्ट्रात रस्ते निर्माण करताना निधी उभारु शकलो असं यावेळी त्यांनी सांगितलं.
उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरीबांसाठी असल्याचं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. ‘TaxIndiaOnline’ या पोर्टलने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.
४०० कोटी खर्चूनही रस्त्याचे काम निकृष्ट; नितीन गडकरींनी जाहीरपणे मागितली जनतेची माफी, म्हणाले…
नितीन गडकरी यांनी यावेळी चीनचाही उल्लेख केला. उदारमतवादी आर्थिक धोरण देशाच्या विकासात कशाप्रकारे मदत करतं याचं चीन हे उत्तम उदाहरण असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अधिक कॅपेक्स गुंतवणुकीची गरज असल्याचं मत गडकरींनी यावेळी मांडलं.
नितीन गडकरींनी यावेळी राष्ट्रीय महामार्ग उभे करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) सर्वसामान्यांकडून पैसा गोळा करत असल्याचं सांगितलं. आपलं मंत्रालय २६ हरित राष्ट्रीय महामार्ग उभे करत असून, त्यासाठी निधी कमी पडत नसल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली.