देशात सध्या काँग्रेसविरोधी वातावरण असले तरी भारतीय जनता पक्ष हा काँग्रेससाठी पर्याय होऊ शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी गुरुवारी येथे केले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
करात हे सध्या संघर्ष संदेश यात्रेमध्ये सहभागी झाले असून यात ते अन्न व खत सुरक्षा, भूसंपादन, बेरोजगारी, शिक्षण व आरोग्याबाबतचे अधिकार, भ्रष्टाचार आदी मुद्दय़ांवर जनजागरण करत आहेत. कानपूर येथून इटावा येथे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप हा काँग्रेससाठी कधीही पर्याय नव्हता. देशाला या दोन पक्षांच्या पलीकडे जाऊन पर्याय हवा असून आमच्या समविचारी पक्षांनी आमच्यासोबत येऊन नवी आघाडी स्थापन करणे आवश्यक आहे, मात्र ही तिसरी आघाडी आगामी निवडणुकीपूर्वी अस्तित्वात येणे शक्य नाही, असे ते म्हणाले. समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता करात यांनी केवळ हसून या प्रश्नाला बगल दिली.
मोदींवर टीका  गुजरातमध्ये जोमाने विकास होत आहे, असे चित्र सध्या उभे केले जात आहे, मात्र तेथे केवळ उद्योजक आणि भांडवलवादी लोकांची भरभराट होत आहे. उद्योजकांना हजारो एकर जमिनी स्वस्तात देण्यात आल्या असून करसवलत व वीजदरातही सवलत देण्यात आली आहे.