महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘शौर्य दिवस’ कार्यक्रमावरून राज्यसभेत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. गोडसेच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात ‘शौर्य दिवस’ साजरा करण्यात आला असून, त्यासाठी दोन आमदारांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या हुसैन दलवाई यांनी राज्यसभेत देताच विरोधकांनी एकच गलका केला. आग्रा शहरात सक्तीचे धर्मातरण केल्याची घटना समोर आली असताना आता राष्ट्रपित्याच्या मारेकऱ्याला ‘शौर्य दिवस’ साजरा करून गौरवण्यात आले, असा आरोप दलवाई यांनी भाजपवर केला. नथुराम गोडेसेचे समर्थन कदापि होवू शकत नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिले.
या मुद्यावरून सभागृह दोनदा तहकूब झाले. सभागृहाने एकमुखाने महाराष्ट्रातील या घटनेचा निषेध करावा. कोणत्याही परिस्थितीत गांधीजींच्या हत्येचे समर्थन केले जाणार नाही, असे काँग्रेसचे आनंद शर्मा म्हणाले. आम्हीदेखील हा प्रकार कधीही सहन करणार नाही, असे संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू म्हणाले. मी हे अधिकृतपणे घोषित करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. नायडू यांच्या स्पष्टीकरणानंतर मात्र विरोधकांचे समधान झाले. भाजपच्या साक्षी महाराजांनी नथूराम गोडसेला देशभक्त ठरवून टाकले. गोडसे देशभक्त होते व गांधीजींनीदेखील देशासाठो मोठे योगदान दिले, अशी प्रतिक्रिया साक्षी महाराजांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना दिली. त्यावरून विरोधक अजूनच संतप्त झाले. आपण असे बोललोच नाही, अशी सारवासारव करण्याची वेळ नंतर साक्षी महाराजांवर आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा