नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) दिल्लीतील चार आमदारांना भाजपमध्ये सामील व्हा अन्यथा केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लादलेल्या खोटय़ा खटल्यांना तोंड देण्यास तयार राहा, असे लाचेचे प्रलोभन आणि धमकी भाजपतर्फे देण्यात आल्याचा आरोप ‘आप’तर्फे करण्यात आला.

येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार संजय सिंग यांनी हा आरोप केला. संबंधित चार आमदारही या वेळी उपस्थित होते. सिंग यांनी सांगितले की, अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारती आणि कुलदीप कुमार या आमदारांबाबत हा प्रकार झाला. भाजपच्या काही नेत्यांसह त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यांच्याकडून हा प्रस्ताव आला होता. या आमदारांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकी २० कोटी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. जर त्यांनी इतर आमदारांना सोबत आणले तर २५ कोटीही देण्याचे प्रलोभन दाखवले होते. जर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारून भाजपमध्ये जाणे नाकारले, तर मात्र उपमुख्यमंत्री सिसोदियांप्रमाणे त्यांना ‘सीबीआय’, ‘ईडी’च्या कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी धमकीही भाजपच्या या नेत्यांकडून देण्यात आली होती.

पंतप्रधान मोदींनी कुठल्याही प्रकारे आपच्या आमदारांना फोडून भाजपमध्ये न्यायचे आहे व केजरीवाल सरकार पाडायचे आहे. महाराष्ट्रात शिवसेना फोडून एकनाथ शिंदे गट वेगळा करण्यात भाजपला यश आले. मात्र, मनीष सिसोदियांच्या बाबतीत त्यांना अपयश आले. आता हा प्रयोग ‘आप’च्या आमदारांवर सुरू झाला आहे, असे संजय सिंग यांनी सांगितल़े

प्रकरण खूपच गंभीर : केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक अरिवद केजरीवाल यांनी हे प्रकरण खूपच गंभीर असल्याचे ‘ट्वीट’मध्ये नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी रणनीती ठरवण्यासाठी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक ठेवल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

आम्ही भगतसिंग यांचे अनुयायी!

‘ट्विटर’वर सिसोदिया यांनी ‘सीबीआय’चा गैरवापर आणि पैशांचे प्रलोभन देऊन आमदार गळाला लावण्याच्या प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप केला. ‘आप’चे आमदार-कार्यकर्ते प्रसंगी पदत्याग करतील; परंतु पक्षाचा विश्वासघात करणार नाहीत. कारण ते केजरीवालांचे सैनिक व स्वातंत्र्यसेनानी भगतसिंगांचे सच्चे अनुयायी आहेत.

Story img Loader