भाजपने आपल्याला दिल्लीचा मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव दिला होता, अशी माहिती आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विश्वास यांनी हा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन दिवसांनी गाझियाबाद येथील निवासस्थानी पहिल्यांदाच खासदार बनलेल्या नेत्याने माझी भेट घेतली होती. पहाटे साडेतीनपर्यंत ते मला समजावत होते की भाजपचे सरकार बनवण्यासाठी मी मदत करावी. मुख्यमंत्री म्हणून मला समर्थन देण्यास ते तयार आहेत. भाजपसहित आम आदमी पक्षातील १२ आमदारांचा पाठींबा देण्याचे आश्वासनही भाजपकडून देण्यात आल्याचे विश्वास यांनी म्हटले आहे. पण, तात्काळ मी हा प्रस्ताव धुडकावून लावल्याचे विश्वास यांनी सांगितले.
विश्वास यांच्या दाव्यानंतर भाजपने मात्र सर्व आरोपांचे खंडन केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव आर. पी. सिंह म्हणाले, की आता अशा प्रकारच्या वक्तव्यांना काहीच अर्थ नाही. अरविंद केजरीवाल माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला मुख्यमंत्री बनण्याचा प्रस्ताव दिला होता, असे वक्तव्य मी सुद्धा करू शकतो. चर्चेत राहण्यासाठी कुमार विश्वास यांच्याकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत.  विश्वास यांनी  अमेठीतून निवडणूक लढवली होती व त्यांचा अत्यंत वाईट पराभव झाला होता.

Story img Loader