केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीवरून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या सदस्यांनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
जेटली शासकीय परदेश दौऱ्यावर असल्याने अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा चर्चेदरम्यान उपस्थित राहतील, या लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या सूचनेला धुडकावून लावत काँग्रेस सदस्यांनी चर्चा करण्यास नकार दिला.
अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत दोनदा दाखल होत विरोधकांनी घोषणा दिल्या. याच गोंधळात लोकसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. अखेरीस अर्थसंकल्पावरील चर्चा गुंडाळण्यात आली.
नियमानुसार अर्थसंकल्पावरील चर्चेस प्रारंभ होत असताना केंद्रीय अर्थमंत्री सभागृहात उपस्थित राहणे बंधनकारक नाही. अर्थ राज्यमंत्री वा केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याच्या उपस्थितीत चर्चा सुरू होऊ शकते. संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन वारंवार याच नियमाचा दाखला देत होत्या. महाजन यांनी तसे ‘रूलिंग’ दिले. मात्र आतापर्यंत संसदीय परंपरेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा एकदाही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सुरू झाली नसल्याचा दावा करीत काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेतला. परंपरा बदलू नका, अशी विनवणी खरगे करीत होते. नायडू मात्र भूमिकेवर ठाम होते.
दक्षिण अफ्रिकेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले जेटली सोमवारी मायदेशी परतणार आहेत; तसे त्यांनी मला कळवल्याचे सुमित्रा महाजन म्हणाल्या. त्यावर अर्थसंकल्पावरील चर्चा सोमवारीच घेण्याची मागणी खरगे यांनी केली. खरगे म्हणाले की, शुक्रवारी व सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा होणार असल्याचे नायडूंनी आम्हाला सांगितले होते. मात्र त्यांच्या बोलण्यात कुठेही जेटली अनुपस्थित राहणार असल्याचा उल्लेख नव्हता. तसे त्यांनी न सांगितल्याने आम्ही आक्षेप घेत आहोत. नायडू यांनी एका शब्दानेही आम्हाला तसे सांगितले नाही. खरगे यांच्या या आक्षेपावर सत्ताधारी कोंडीत सापडले. अखेरीस अर्थसंकल्पावरील चर्चा गुंडाळण्यात आली.
नियमानुसार सत्ताधाऱ्यांची बाजू योग्य असली तरी विरोधकांनी संसदीय परंपरेचा दाखला देत भाजपला जेरीस आणले. जेटली परदेश दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत देण्यात आली नाही. संपुआ सरकारमध्ये पी. चिंदबरम अर्थमंत्री असताना अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान अनुपस्थितीत राहणार होते. चर्चेची सुरुवात भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी करणार होते. तेव्हा चिदंबरम यांनी आपल्या अनुपस्थितीची माहिती डॉ. जोशी यांना दिली होती. त्यास जोशी यांनी आक्षेप घेतला नव्हता. सभागृह व्यवस्थापनाचा (फ्लोअर मॅनेजमेंट) हा संकेत सत्ताधाऱ्यांनी न पाळल्याने विरोधकांनी त्यांची कोंडी केली.