अयोध्येतील राम मंदिराचे आश्वासन न पाळणारा भाजप नकली रामभक्तांचा पक्ष असल्याची घणाघाती टीका शिवसेनेच्या उत्तर प्रदेशातील नेत्याने केली आहे. अनिल सिंग हे उत्तर प्रदेशातील शिवसेना पक्षाची धुरा सांभाळतात. त्यांनी रविवारी कानपूर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. आम्ही जे बोलतो तेच करतो, त्यामुळे नकली रामभक्तांपासून सावध राहा, असे सूचक विधान सिंग यांनी कार्यक्रमात केले. याशिवाय, उत्तर प्रदेशातील ४०३ जागांवरील आगामी निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढवेल आणि सत्तेत आल्यास अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवेल, अशी घोषणाही त्यांनी केली.
मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने सक्षम करायचे असेल तर त्यांना निव्वळ सूट किंवा आरक्षणे देऊन चालणार नसल्याचेही सिंग यांनी सांगितले. त्यासाठी मुस्लिम समाजाने सर्वप्रथम दोन अपत्येच जन्माला घालण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे आणि नसबंदीची शस्त्रक्रिया करून घ्यायला तयार झाले पाहिजे, असा सल्ला सिंग यांनी दिला. केंद्रात सत्ता येऊनसुद्धा भाजप अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नाही, कारण ते रामाचे खरे भक्त नाहीत. मात्र, उत्तर प्रदेशात निवडणूक लढवताना हा मुद्दा शिवसेनेच्या अजेंड्यावर असेल, अशी ग्वाही सिंग यांनी दिली. याशिवाय, समाजवादी पक्षाच्या मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याच्या राजकारणावर टीका करताना सिंग यांनी त्यांना नमाजवादी पक्ष म्हणून संबोधले. पश्चिम उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी आपल्या बोलण्याला जोडली. शिवसेनेने यापूर्वी २०१२मध्ये उत्तर प्रदेशात ३१ जागांवर निवडणूक लढविली होती. मात्र, त्यापैकी एकही जागा सेनेला जिंकता आली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा