जम्मू-काश्मीरमध्ये अटींच्या आधारे सरकार स्थापन केले जाणार नाही असे भाजपने निक्षून सांगितल्यामुळे राज्यात पीडीपी-भाजप आघाडी सरकारची पुनस्र्थापना करण्याचे प्रयत्न शुक्रवारी अपयशी ठरले.
पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, नव्या सरकारच्या स्थापनेसाठी दोन्ही बाजूंनी मागील दाराने होत असलेली बोलणी अपयशी ठरली असल्याचे संकेत पीडीपीच्या सूत्रांनी दिले. सरकार स्थापनेत यापूर्वी असलेला तिढा अद्याप कायम असून, कुठल्याही प्रकारच्या अटी हा सरकार स्थापन करण्याचा आधार असू शकत नाही, असे आघाडीसाठी भाजपतर्फे प्रयत्न करणारे पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी अधिकृतरीत्या सांगितले.
बोलण्यांमध्ये काहीही प्रगती झालेली नाही. जोवर आमचा प्रश्न आहे, तोवर मुफ्ती मोहम्मद हे मुख्यमंत्री असताना लागू असलेल्या अटींमध्ये काहीही बदल झालेला नाही. मुफ्तीसाहेब आता जिवंत नाहीत, एवढाच बदल झालेला असून नवा नेता नेमून कारभार सुरू ठेवणे हे पीडीपीचे काम आहे, असे माधव म्हणाले.
आमच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही. ज्या अटी पूर्वी अस्तित्वात होत्या, त्यांच्या आधारावरच नवे सरकार स्थापन केले जावे असे आम्ही त्यांना सांगितले आहे, असे मेहबूबा मुफ्ती व अमित शाह यांच्या भेटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात माधव यांनी सांगितले.

Story img Loader