दक्षिणेतील कर्नाटकात सत्ता मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर भाजपाने आता आपले लक्ष शेजारील राज्य तेलंगणावर वळवले आहे. तिथे पुढीलवर्षी म्हणजेच २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी तेलंगणावर जोर दिला असून त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. तेलंगणा विधानसभेत एकूण १२० जागा आहेत. यापैकी एका जागेवर अँग्लो इंडियन समुदायातील सदस्याची नेमूणक केली जाते. उर्वरित ११९ जागांवर निवडणुका होणार आहेत. सध्या विधानसभेत टीआरएसचे ९१ आमदार आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचे १३ तर भाजपाचे फक्त ५ आमदार आहेत.

लक्ष्मण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय स्थिती आणि निवडणुकीच्या योजना निश्चितीसाठी अमित शाह हे पुढील महिन्यात तेलंगणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. नुकताच दिल्लीत अमित शाह यांनी बैठक घेतली होती. त्यात त्यांनी पुढील महिन्यात तेलंगणात येण्याचे संकेत दिले. त्यांनी या बैठकीत तेलंगणावर भर दिला. आता पक्षाकडून तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. राज्यात भाजपा संघटनात्मक पातळीवर मजबूत आहे. राज्यातील कामगिरी सुधरवण्यासाठी मतदान केंद्रावर ‘पान प्रमुख’ मॉडेल अवलंबले जाणार आहे.

विविध राज्यांमध्ये ‘पान प्रमुख’ हे भाजपाचे हे मॉडेल यशस्वी ठरले आहे. यामध्ये एक मतदारयादीतील एका पानाचा प्रमुख बनवला जातो. तो प्रमुख त्या पानावरील मतदाराच्या सातत्याने संपर्कात असतो. लक्ष्मण म्हणाले, ११९ विधानसभा मतदारसंघात सुमारे ४० ते ५० विधानसभा मतदारसंघात पान प्रमुखांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारसंघात येत्या एक किंवा दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल.

Story img Loader