मनीष सिसोदया यांना अटक केल्यानंतर दिल्लीत आता आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये घमासान सुरू झालं आहे. दरम्यान, भाजपाने मनीष सिसोदिया प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाने एक पोस्टर जारी केलं आहे. या पोस्टरद्वारे त्यांनी अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे.
भाजपाने एका चित्रपटाचं पोस्टर जारी केलं आहे. यामध्ये मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचे फोटो दिसत आहेत. सत्येंद्र जैन है हवाला प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे पोस्टरवरील फोटोत त्यांच्या हातात पैसे दाखवले आहेत तर सिसोदिया हे कथित मद्य घोटाळा प्रकरणी तुरुंगात असल्याने त्यांच्या हातात मद्याची बाटली दिसत आहे.
भाजपाने तयार केलेल्या या पोस्टरवर लिहिलं आहे की, “AAP Presents जोडी नंबर १, प्रोड्यूस्ड बाय : अरविंद केजरीवाल, इन तिहार थिएटर्स नाऊ”. जैन यांच्या डोक्यावर टोपी आहे त्यावर “अॅक्टर नंबर १, हवाला घोटाळेबाज” असं लिहिलं आहे. तर सिसोदिया यांच्या टोपीवर “अॅक्टर नंबर २, मद्य घोटाळेबाज” असं लिहिलं आहे. दरम्यान, हे पोस्टर ट्विटरवर शेअर करताना कॅप्शन दिलंय की, “मनीष सिसोदिया, सत्येंद्र तो झांकी है, इनका सरगना केजरीवाल अभी बाकी है!!” (मनीष सिसोदिया, सत्येंद्र ही तर फक्त सुरुवात आहे, यांचा प्रमुख अरविंद केजरीवाल अजून बाकी आहे.)
हे ही वाचा >> Love Jihad : “मंगलप्रभात लोढांनी माफी मागावी”, अबू आझमींची मागणी, गुलाबराव म्हणाले “माझ्या गावी चला…”
आपविरोधात भाजपाचा मोर्चा
दरम्यान, दिल्लीत भारतीय जनता पार्टीने आम आदमी पार्टीविरोधात मोर्चा काढला. भाजपा नेते आणि खासदार मनोज तिवारी म्हणाले की, जे सिसोदिया यांच्यासोबत झालं, तेच केजरीवाल यांच्यासोबत होणार आहे. सीबीआयनंतर आता ईडीने देखील पुराव्यांच्या आधारावर मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. दिल्लीतली जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. या लोकांनी (आप) राज्य उद्ध्वस्त केले आहे.