पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी जनता परिवाराच्या छत्रछायेखाली पूर्वीच्या जनता पक्षातील नेते एकत्र आल्यानंतर आता याच परिवारातील महत्त्वाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास भाजपनेही सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये भाजपकडून काही पोस्टर्स लावण्यात आली असून, यामाध्यमातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
मुलायमसिंह यादव ‘हरवले’ असून, समाजवादी पक्षातील त्यांच्या कार्यकर्त्यांसह कोणीही त्यांना शोधून आणल्यास त्यांचा सत्कार करण्यात येईल, असे पोस्टर्स सध्या आझमगढमध्ये लावण्यात आले आहेत. भाजपच्या प्रदेश शाखेकडूनच ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. मुलायमसिंह यादवे हे आझमगढमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून आजपर्यंत ते आपल्या मतदारसंघात फिरकलेलेच नाहीत. त्यामुळेच या पोस्टर्सच्या माध्यमातून मुलायमसिंह यादव यांच्यावर टीका करण्यात आली आहे. आझमगढ की जनता करे पुकार, खोजो मुलायम पाओ इनाम त्याचबरोबर आझमगढ ने किया ऐलान, खोजो सांसद, पाओ इनाम असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे.
मुलायमसिंह यादव यांनी लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढविली होती. मैनपूरी आणि आझमगढ या दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी मैनपूरी या मतदारसंघाचा राजीनामा दिला आणि आझमगढ याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला. आझमगढमध्ये त्यांनी भाजपच्या रमाकांत यादव यांचा ६३,२०४ मतांनी पराभव केला होता.
भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून मुलायमसिंह यांच्याविरूद्ध मोहीम उघडण्यात आली असून, आझमगढ मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागातच वरील आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

Story img Loader