नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या पसमांदा मुस्लिमांना आकर्षित करण्याच्या धोरणाला यश येऊ लागले आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये पसमांदा मुस्लिमबहुल भागातील बरेलीच्या शाही नगर पंचायतीमध्ये भाजपचा ओबीसी हिंदू उमेदवार पहिल्यांदाच अध्यक्ष झाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ‘पिछडा पिछडा एक समान, हिंदू हो या मुसलमान’ असा नारा देऊन पसमांदा मुस्लिमांना विकासाचे आश्वासन योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने दिले होते. बरेली जिल्ह्यातील शाहीनगर पंचायत हा मुस्लिमबहुल इलाखा असून तिथे पसमांदा मुस्लिमांनी मते दिल्यामुळे वीरपाल मौर्य हे भाजपचे हिंदू ओबीसी उमेदवार पंचायत अध्यक्ष झाले आहेत. इथे सलग सहा वेळा मुस्लिमांमधील उच्चवर्णीय पठाण कुटुंबातील सदस्य पंचायत अध्यक्ष बनले होते. इथे ८० टक्के मुस्लीम मतदार असून त्यापैकी ६०-६५ टक्के मतदार पसमांदा मुस्लीम आहेत.
शाहीनगर पंचायतमध्ये पसमांदा मुस्लिमांची संख्या अधिक असूनही इथे कधीही पसमांदा मुस्लीम वा हिंदू अध्यक्ष बनला नव्हता. ही जागा खुल्या गटातील असून या वेळी पहिल्यांदाच ओबीसी हिंदू उमेदवाराला पंचायत अध्यक्ष होण्याची संधी मिळाली, अशी माहिती राष्ट्रवादी मुस्लीम पसमांदा समाजाचे अध्यक्ष व भाजपचे नेते अतिफ रशीद यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७१ मुस्लीम नगरपालिका सदस्य व पंचायत सभासद म्हणून जिंकून आले असून त्यापैकी ५५ पसमांदा मुस्लीम आहेत. अन्य पाच पंचायतींमध्ये भाजपचे मुस्लीम उमेदवार अध्यक्ष झाले असून त्यापैकी तीन पसमांदा मुस्लीम आहेत. २५ पंचायत व नगरपालिकांमध्ये पसमांदा मुस्लिमांनी पहिल्यांदा भाजपला मते दिली, असेही रशीद यांनी सांगितले.
गेल्या वर्षी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेते- कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांपर्यंत केंद्राच्या योजना पोहोचवण्याची सूचना केली होती. या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच ५०० हून अधिक मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामध्ये बहुतांश पसमांदा होते. सहारणपूर महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे अजय सिंह विजयी झाले. तिथेही १८ हजार पसमांदा मुस्लिमांनी मते दिल्यामुळे सिंह महापौर बनले, असे ट्वीट भाजपचे महानगर अध्यक्ष राकेश जैन यांनी केले आहे.