नवी दिल्ली : मणिपूर प्रकरणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करण्याची केलेली विनंती आणि राज्यातील संकट दूर करण्यास अपयशी ठरल्याच्या आरोपावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले. मणिपूरमधील अशांततेच्या मुद्द्यावरून टीका करताना काँग्रेसकडून मणिपूरबाबत चुकीचे कथानक पसरविले जात असल्याचा आरोप नड्डा यांनी खरगे यांना लिहिलेल्या पत्रात केला.
हेही वाचा >>> अदानी लाचखोरीप्रकरणी राज्यांनी आरोप फेटाळले
तत्कालीन काँग्रेस सरकारने भारतात परदेशी अतिरेक्यांच्या स्थलांतराला केवळ कायदेशीर मान्यताच दिली नाही तर तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्याशी करारही केले होते, हेच खरगे विसरले असल्याची टीका नड्डा यांनी काँग्रेस पक्षावर केली.
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : काँग्रेस
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेले पत्र खोटे असून मणिपूरच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याला कधी भेट देणार आणि गृहमंत्री अमित शहा त्यांच्या मणिपूरमधील ‘घोर अपयशाची’ जबाबदारी कधी घेणार? असा प्रश्नदेखील पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपला विचारला आहे.
मणिपूरमध्ये सत्तेत असताना स्थानिक समस्या हाताळण्यात काँग्रेसच्या पूर्ण अपयशाचे परिणाम अजूनही जाणवत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस वारंवार मणिपूरमधील परिस्थिती खळबळजनक करण्याचा प्रयत्न करत आहे. – जे.पी. नड्डा, अध्यक्ष, भाजप