भाजपाने कर्नाटकमध्ये एक आगळेवेगळे आंदोलन पुकारले आहे. सिद्धरामय्या यांच्या सरकारमधील मंत्री के. व्यंकटेश यांनी गोहत्येवरून केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपाने आंदोलन छेडले असून गायींना रस्त्यावरून घेऊन उतरले आहेत. तसंच, त्यांनी सत्ताधांऱ्यांविरोधात घोषणाबाजीही केली आहे.
के.व्यंकटेश यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा कार्यकर्ते गायींनी घेऊन रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. कर्नाटक सरकारने अद्यापही त्यांच्या पाच योजना लागू केल्या नसल्याचाही आरोप भाजपाने केला आहे. यावरूनही भाजपाने बंगळुरूत धरणे आंदोलन केले आहे.
के.व्यंकटेश गोहत्येवरून काय म्हणाले होते?
“म्हशींची कत्तल होऊ शकते तर गायींची का नाही?” असा सवाल सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील पशुपालन मंत्री के.व्यंकटेश यांनी शनिवारी उपस्थित केला होता. त्यांच्या या वाक्यावरून राज्यभरात भाजपाने विरोध दर्शवला आहे. भाजपाने रस्त्यांवर गायी आणून त्यांची पूजा केली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते जमा झाले होते.
कर्नाटकात भाजपा सरकारने २०२१ साली गोहत्या प्रतिबंध कायदा तयार केला होता. या कायद्यावर काँग्रेस सरकार आता अधिक संशोधन करणार आहे. राज्यातील पशुपालन मंत्री के व्यंकटेश यांच्या या वक्तव्यामुळे संकेत मिळत आहेत. “वय झालेल्या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो”, असंही व्यंकटेश म्हणाले होते.
“काँग्रेसने जाहीरनाम्यात केलेल्या आश्वसानांबाबत आंदोलन करण्याचा भाजपाला नैतिक अधिकार नाही”, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. “भाजपा हा लोकविरोधी पक्ष आहे. त्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा त्यांनी राज्याला लुटलं. इंदिरा कॅन्टिन, सौभाग्य आणि विद्यार्थ्यांना सायकल या योजना त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्याच नाहीत, असंही सिद्धरामय्या म्हणाले.