पीटीआय, नवी दिल्ली
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर भ्रष्टाचारासह अनेक गुन्हेगारी आरोपांवरील खटले दाखल झाले आहेत. यात केंद्रीय यंत्रणांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकारामुळे काँग्रेसचा पर्दाफाश झाल्याचा आरोप करत अशा भ्रष्ट कारभार असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आपण उभे राहणार का, असा सवाल भाजपने काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकच्या लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) भूखंड वाटप प्रकरणात सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवला. बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने बुधवारी सिद्धरामय्या यांच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यासाठी लोकायुक्त पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. दरम्यान, राजकीय कारणांसाठी भाजप मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेस नेतृत्वाने केला होता. त्यावरून भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी पत्रकार परिषदेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.
‘विद्यामान मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी बनवून काँग्रेसचा ‘भ्रष्ट चेहरा’ उघडकीस आणण्याची ही दुर्मिळ घटना आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी ते उभे आहेत का,’ असा सवाल करत त्रिवेदी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. हा खटला सिद्धरामय्या यांच्या स्वत:च्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने बेकायदा पद्धतीने संपत्ती मिळविण्यासाठी सरकारी अधिकारांचा गैरवापर केल्याचा दावा त्रिवेदी यांनी केला.
तृणमूल काँग्रेसवरही टीका
‘आयएएस’ अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हेगारांशी असलेल्या संबंधांबद्दल पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षावरही सुधांशू त्रिवेदी यांनी टीका केली. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणातील पोलीस तपासावर केलेल्या टीकात्मक निरीक्षणाचा उल्लेखही त्रिवेदी यांनी केला. यातूनच पश्चिम बंगाल हे राज्य महिलांसाठी किती धोकादायक बनले आहे, सरकारी अधिकारी आणि गुन्हेगार यांच्यात संगनमत दिसून येत असल्याचा आरोपी त्यांनी केला.