BJP On Rahul Gandhi frequent visits to Vietnam : भारतीय जनता पक्षाने शनिवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम आणि इतर देशांच्या दौऱ्यांवरून टीका केली आहे. कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक न करता केलेले हे दौरे विरोधीपक्ष नेत्यासाठी अशोभनीय असल्याचा मुद्दा भाजपाने उपस्थित केला आहे. तसेच हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या या दौऱ्यांबद्दल भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “नवीन वर्षे व्हिएतनाममध्ये, होळी सुद्धा व्हिएतनाममध्येच? मला सांगण्यात आले की त्यांनी २२ दिवसांचा वेळ व्हिएतनामध्ये घालवला. त्यांनी त्यांच्या स्वत:चा मतदारसंघात, रायबरेलीमध्येही तेवढा वेळ घालवलेला नाही.” रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम प्रेमाबाबत प्रश्न उपस्थित केले. तर भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख मालवीय यांनी काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या सततच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती उघड करावी अशी मागणीही केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “विरोधी पक्ष नेता म्हणून राहूल गांधी हे महत्त्वाच्या पदावर आहेत आणि त्यांचे परदेशातील अनेक गुप्त दौरे विशेषतः संसदेचे अधिवेशन सुरू असताना, शिष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करतात.”

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आणि भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांच्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता त्या काळात राहुल गांधी यांनी व्हिएतनामला भेट दिली हाती.

२६ डिसेंबर रोजी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधी व्हिएतनामला गेल्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. देश माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या दुःखात बुडालेला असताना राहुल गांधी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देश सोडून गेल्याची टीका भाजपाने केली होती. राहुल गांधींनी त्यांच्या सोयीच्या राजकारणासाठी डॉ. सिंग यांच्या मृत्यूचे राजकारण केले आणि त्याचा गैरफायदा घेतला, परंतु त्यांचा अवमान विसरता येणारा नाही, असेही मालवीय म्हणाले होते.

असे असले तरी काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम दौऱ्यांचा बचाव करताना राहुल गांधी त्या देशाच्या आर्थिक मॉडलेचा अभ्यास करण्यासाठी भेटी देतात असे पक्षाने सांगितले होते. “ते (राहुल गांधी) त्यांच्या आर्थिक मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी तिथे गेले आहेत,” असे काँग्रेस नेते हरीश रावत यांनी म्हटले होते.