भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना पूर्ती समूहातील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून सतत लक्ष्य करीत असलेले ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभेचे सदस्य ८९ वर्षीय राम जेठमलानी यांच्यावर रविवारी निलंबनाची कारवाई केल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्याचा निर्णय आज भाजपच्या संसदीय बोर्डाने घेतला.
राम जेठमलानी आणि त्यांचे पुत्र महेश जेठमलानी यांच्यासह माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, चित्रपट अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा तसेच हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांताकुमार यांनी गडकरी यांना लक्ष्य केले असून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सीबीआयच्या संचालकपदी रंजित सिन्हा यांच्या नियुक्तीला लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी विरोध केला होता. त्यावरून वाद उकरून काढून जेठमलानी यांनी स्वराज-जेटली यांच्यावर टीका करतानाच गडकरी यांना पुन्हा लक्ष्य केले. त्यामुळे भाजपने रविवारी शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करताना त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यापाठोपाठ आज सायंकाळी भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत जेठमलानी यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
भाजपमधून राम जेठमलानीयांच्या हकालपट्टीची तयारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना पूर्ती समूहातील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून सतत लक्ष्य करीत असलेले ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभेचे सदस्य ८९ वर्षीय राम जेठमलानी यांच्यावर रविवारी निलंबनाची कारवाई केल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये
First published on: 27-11-2012 at 02:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ready to throw out ram jethmalani from the party