आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सट्टेबाजीचा आरोप असलेल्या ललित मोदी यांना ‘मानवतेच्या भूमिके’तून मदत केल्याचा पवित्रा घेत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची पाठराखण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरील आरोपांबाबत मात्र सावध पवित्रा घेत जोवर सर्व कागदपत्रे स्पष्ट होत नाहीत, तोवर राजेप्रकरणी कोणी काही बोलू नये, असे सर्वच नेत्यांना सांगितल्याने पक्षात तर्कवितर्काना उधाण आले आहे. विशेष म्हणजे स्वराज यांनी मोदी यांना पोर्तुगालला जाता यावे यासाठी ब्रिटनमधील भारतीय दूतावासाला कळविल्याची कबुली दिली आहे तर राजे यांच्याबाबत जी कागदपत्रे उघड झाली आहेत त्यात त्यांचे नाव वा स्वाक्षरीही नाही.
राजे यांनी ललित मोदी यांच्या स्थलांतरासाठी साह्य़ केल्याचा आरोप असून याबाबत राजे यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व आपली बाजू मांडली. ललित मोदी यांच्या कुटुंबियांशी आपले अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत, पण या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नाही, असे राजे यांनी शहा यांना सांगितल्याचे समजते. काँग्रेस मात्र याप्रकरणी अत्यंत आक्रमक झाली आहे. राजे यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारपासून राजस्थानात काँग्रेस आंदोलन सुरू करणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ललित मोदी यांना आपण भारतात परतून कायदेशीर लढाईला तोंड देण्याचे आवाहन केले होते, असे म्हटले आहे. अर्थात मोदी यांना खटल्यांची भीती नव्हती तर आपल्या जिवाला धोका आहे, असे त्यांचे मत होते, असे पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा