सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्वच आज दिसले नसते, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना दिले आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे जवाहरलाल नेहरू यांच्याऐवजी देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र आज वेगळे दिसले असते या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी खरपूस समाचार घेतला.
दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, जर पटेल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याऐवजी पहिले पंतप्रधान झाले असते तर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे अस्तित्व आज राहिले नसते याबाबत शंका नाही. राजा भोज विमानतळावर काल रात्री उशिरा ते पत्रकारांशी बोलत होते. अहमदाबाद येथे सरदार पटेल यांच्या वस्तुसंग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी मोदी यांनी नेहरू  यांच्याऐवजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर वेगळे चित्र दिसले असते असे वक्तव्य केले होते व त्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या गुळमुळीत भाषेत टीकाही केली होती. दोन्ही नेत्यांनी पहिले गृहमंत्री असलेले सरदार पटेल यांचा वारसा सांगण्याचा प्रयत्न केला होता.
मोदी यांनी हे लक्षात ठेवावे की, सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जातीय दंगे भडकावल्याबद्दल बंदी घातली होती असे ते म्हणाले.
दरम्यान मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकेल असा अंदाज वर्तवणारे सर्व पाहणी अहवाल दिग्विजय सिंग यांनी फेटाळून लावले. हे सर्व अहवाल फाडून कचरापेटीत टाकून दिले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले पंतप्रधान व्हायला हवे होते अशी देशाची खंत आहे. प्रत्येक भारतीयाला असे सरदार पटेल पंतप्रधान व्हावे असे वाटत होते पण नेहरू पहिले पंतप्रधान झाल्याने त्याचे अजूनही वाईट वाटते, ते पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र आज वेगळे दिसले असते असे मोदी म्हणाले होते.

‘निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांचे निष्कर्ष केराच्या टोपलीत फेका’
मध्य प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीत सत्तारूढ भाजपलाच पुन्हा विजय मिळेल, असे भाकीत निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांमधून वर्तविण्यात आल्याने काँग्रेसचे नेते चांगलेच संतप्त झाले आहेत. जवळपास १० वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या चाचण्यांचे निष्कर्ष फेटाळले आहेत. अशा प्रकारच्या चाचण्यांचे निष्कर्ष फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी विरोधी पक्षनेते अजय सिंग यांनी मात्र ही शक्यता फेटाळली आहे. भाजपच्या राजवटीचा जनतेला उबग आला असून त्यांना आता बदल हवा आहे, असे अजय सिंग यांनी सांगितले.