कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी आणि अन्य नेत्यांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपतर्फे राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात राज्य सचिवालयावर (नबन्ना) मोर्चात भाग घेण्यासाठी राज्यभरातील भाजप समर्थक मंगळवारी सकाळी कोलकाता आणि लगतच्या हावडा येथे पोहोचू लागले होते. भाजपने ‘नबन्ना अभियान’ सुरू केले आहे. पोलिसांनी अनेक भाजप समर्थकांना ताब्यात घेतले आणि काही जखमीही झाले. दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले आहेत.

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे दोन नेते पार्थ चॅटर्जी आणि अनुब्रत मंडल यांना अटक केल्यानंतर, ‘तृणमूल’च्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी व मोठे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भाजपने राज्य सचिवालयावर मोर्चा आयोजित केला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या बंगालच्या दक्षिण भागांतील जिल्ह्यांच्या प्रशासकीय दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “असा प्रकल्प निसटलाच…”

सचिवालयाकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले व त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे हावडा आणि मध्य कोलकात्याचा बहुतांश भागात पोलीस आणि भाजपच्या आंदोलकांत धक्काबुक्की, झटापट झाली. त्यामुळे हा परिसरास जणू रणभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोलकाता आणि हावडा येथे हजारो भाजप समर्थक रस्त्यावर उतरले होते व सचिवालयाकडे निघाले होते. प्रदेशाध्यक्ष मुजुमदार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चितपूर पोलीस ठाण्यात नेले. त्याआधी बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अधिकारी, हुगळीचे खासदार लॉकेट चटर्जी यांना ते हावडा येथे पोहोचून पक्ष कार्यकर्त्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले.

हावडातील संत्रागाछी येथे आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडल्यानंतर व पाण्याचे फवारे सोडताच हिंसाचाराला सुरुवात झाली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. संत्रागाछी येथील स्थिती बराच काळ तणाव आणि हिंसाचारग्रस्त होती. येथे पोलीस आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार झटापट व हाणामारी झाली. संत्रागाछीप्रमाणेच हावडा मैदान आणि हावडा रेल्वेस्थानकापाशी हिंसाचार उफाळला होता. कोलकाता येथे लालबझार पोलीस मुख्यालयापाशी आणि एम. जी. रस्त्यावर पोलिसांना आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.

कोलकात्यातील वर्दळीचा एम. जी. रस्ता भागात भाजपच्या आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनाला आग लावली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले, मात्र, काही मिनिटांतच भाजपचे आंदोलक पुन्हा येथे जमा झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.

सुकांत मुजुमदार यांना ताब्यात घेऊन चितपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी मुजुमदार यांनी हावडा रेल्वे स्थानकावर रात्री मुक्काम करून हावडा मैदानावर निदर्शने केली. यावेळी ते म्हणाले, ‘‘दीदी (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) रस्त्यावर इतके भाजप समर्थक पाहून घाबरल्या. आम्ही येण्याचे आवाहन केलेल्यांपैकी फक्त ३० टक्के समर्थक येथे पोहोचू शकले आहेत; अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ते पोहोचू शकलेले नाहीत.’’

कोलकात्यातील मुरलीधर सेन लेन येथील भाजपच्या प्रदेश मुख्यालयाजवळ पोलिसांच्या मोठय़ा तुकडीने भाजप समर्थकांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिंसाचार उफाळला. राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह भाजपचे अनेक खासदार राज्य सचिवालयाकडे निघालेल्या मोर्चात सामील झाले

वाहतूक अनेक तास ठप्प

दुपारी बाराला हावडा आणि कोलकात्याच्या मोठय़ा भागांत वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर पोलीस आणि भाजप आंदोलकांत अनेक तास झटापट सुरूच होती. हुगळी नदीवरील हावडा ते कोलकाता जोडणाऱ्या हावडा पुलावरील वाहतूक दुपारी अनेक तास ठप्प होती. या पुलासह मध्य कोलकात्याच्या इतर भागांत त्यामुळे अनेक नागरिकांनी रस्त्यांवरून चालत जाणे पसंत केले.

Story img Loader