भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंह यांची आज (बुधवार) बिनविरोधपणे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सकाळी झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नितीन गडकरींनी राजनाथ सिंह यांच्या नावाचा ठराव मांडला. काल (मंगळवार) नितीन गडकरी यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवल्यानंतर राजनाथ सिंह यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. आज दुपारी साडेबारा वाजता नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली.
नितीन गडकरी हे स्वच्छ व्यक्तीमत्वाचे नेते आहेत परंतू विरोधी पक्षाने कटकारस्थान रचून केलेल्या आरोपांमुळे त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. जोपर्यंत या सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत कोणतेही पद स्वीकारणार नाही, असे गडकरींनी म्हटले आहे. त्यांच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. संपूर्ण भारतीय जनता पक्ष गडकरींच्या पाठिशी असं राजनाथ सिंह म्हणाले.
देश सध्या संकटात असून जनतेच्या समोर फक्त भाजप हा एकच पर्याय आहे. त्यामुळे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित सरकारच सत्तेवर येईल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
२०१३ ते २०१५ या कालावधीसाठी राजनाथ सिंह यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे २०१३ मधील राज्य विधानसभा निवडणुका आणि २०१४ सालातील लोकसभा निवडणुका राजनाथ सिंह यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत.
दहशतवादाचा सामना करण्याच्या लढाईबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या हिंदू दहशतवादाच्या बेजबाबदार वक्तव्याचा भाजप निषेध करते, असंही सिंह म्हणाले. तसेच शिंदेंच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देशभर आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजनाथ सिंहाचे अभिनंदन केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा