* ‘स्त्रीशक्ती’चा ऐतिहासिक विजय
* आसामातील विजयाने भाजपचे ईशान्येत पाऊल
* केरळात डाव्यांचे पुनरागमन, पुद्दुचेरीत काँग्रेस
तामिळनाडूमध्ये जे. जयललिता, प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकहाती लढा देत पुन्हा सत्तेचे सिंहासन राखले, तर आसाममध्ये भाजपचे कमळ फुलले. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताधाऱ्यांना घरी पाठविण्याची परंपरा कायम राहिली. तेथे डाव्या आघाडीचा लाल तारा पुन्हा उगवला. तमिळनाडूमध्ये मात्र आलटून-पालटून सत्ता देण्याच्या खेळाला तब्बल ३२ वर्षांनंतर खो बसला. तर पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता खेचून घेत ममता बॅनर्जी यांनी एकाच पक्षाला निर्विवाद बहुमत मिळवण्याचा विक्रम चार दशकांनंतर प्रथमच स्थापित केला. ईशान्य भारतात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवित आपल्या खात्यात आणखी एक राज्य जोडले, तर काँग्रेसला केरळ आणि आसाम ही दोन राज्ये गमवावी लागली. केंद्रातील मोदी सरकारच्या लोकप्रियतेची कसोटी म्हणूनही पाहिल्या जाणाऱ्या या निवडणुकीत आसामात मित्रपक्षांसह मिळालेल्या ८५ जागा वगळता भाजपला अन्यत्र फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.
पश्चिम बंगालमध्ये १९७० मध्ये काँग्रेसचे सिद्धार्थ शंकर रे हे एकहाती सत्ता मिळविलेले शेवटचे मुख्यमंत्री ठरले होते. त्यानंतर त्यांच्यापेक्षाही अधिक जागा मिळवत ममता बॅनर्जी यांनी हा विक्रम पुनस्र्थापित केला आहे. तामिळनाडूतही जनमत चाचण्यांचे अंदाज धुळीस मिळवत जयललिता यांनी मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन केले आहे. १९८४नंतरच्या निवडणुकात एकाच नेत्याला सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी तामिळी जनतेने दिली नव्हती. यंदा मात्र अम्मांच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आणि काही बाबतीत तर खटले सुरू असतानाही या दोघींनी केवळ स्वबळावर सत्ता मिळवली आहे.
आसामात १५ वर्षांची काँग्रेसची राजवट संपुष्टात आणत भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सर्वानंद सोनोवाल यांच्या रूपाने भाजपने स्थानिक उमेदवार दिल्याने तसेच गोगोई यांच्या राजवटीला जनता विटूनही काँग्रेसने योग्य पर्याय न दिल्याने भाजपचा विजय सुकर झाला.
केरळात भाजपचे ओ. राजगोपाल हे एकमेव उमेदवार विजयी झाले. केरळात भाजपची मतदानाची टक्केवारी २०११मध्ये ६ टक्के होती. ती यंदा १५ टक्क्य़ांवर गेली. तर काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाहीवादी आघाडी (यूडीएफ)ची टक्केवारी ४५.८ टक्क्य़ांवरून ३९ टक्क्य़ांवर आल्याने काँग्रेसची पाठराखण करणारा हिंदू मतदार भाजपकडे गेल्याने डाव्यांना त्याचा लाभ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पुद्दुचेरीत मात्र काँग्रेसला बहुमताची चव चाखता आली. ३० सदस्यीय विधानसभेत काँग्रेसला मित्रपक्षांसह १७ जागा मिळाल्या आहेत.
बंगालमध्ये ‘हरित क्रांती’
कोलकाता : शारदा चिट फंड घोटाळा, नारद स्टिंग ऑपरेशन आणि सत्तेत असल्याने ओढवणारी मतदारांची नाराजी असे विरोधात जाणारे मुद्दे गौण ठरवत पश्चिम बंगालमधील मतदारांनी विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भरघोस मतदान केले आहे.
तामिळनाडूत जय जयाकार!
चेन्नई : तामिळनाडूत सत्ताधारी अद्रमुकच्या नेत्या आणि मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी सत्ता अबाधित राखत राज्यात गुंतवणुकीला चालना देऊन रोजगारनिर्मिती करण्यात अपयश आल्याचा ठपका पुसून टाकला आहे.
पंतप्रधानपदाची ‘ममता’?
कोलकाता : पश्चिम बंगालमधील एकहाती विजयानंतर, २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी या पंतप्रधानपदीदेखील येऊ शकतील, असा सूर तृणमूल काँग्रेसमधून उमटला. ममता बॅनर्जी यांनी मात्र दूरचित्रवाहिनीशी बोलताना सूचक उद्गार काढले की, ‘‘मला कसलीही लालसा नाही, पण अन्य राज्यांतील काही पक्षांत काही समविचारी सहकारी आहेत. त्यांच्याबरोबर देशाची सेवा करायला मला कधीही आवडेलच.’’ अर्थात तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात ममता आल्या तर डावे पक्ष असतील का, हा पेच आहेच.
कुटुंबराज संपुष्टात
कराइकल : पुद्दुचेरीतील नेरावी मतदारसंघातील बलिष्ट राजकीय घराण्याचा अखंड सत्तेचा वारसा मतदारांनी संपुष्टात आणलाच, पण बाहेरच्या उमेदवाराला विजयाची माळ घातली. या मतदारसंघात अण्णाद्रमुकचे व्ही एम सी शिवकुमार यांचे कुटुंब १९७७पासून सलग नऊ निवडणुकांत विजयी झाले होते. यंदा प्रथमच द्रमुकच्या गीता आनंदन या तेथून ६,९३६ मतांनी विजयी झाल्या. गीता यांनी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी त्यांच्या पतीचे निधन झाले. तरीही त्यांनी जिद्दीने निवडणूक लढवली आणि विजय मिळविला.
एकमेव आमदार, वय वर्षे ८६!
केरळ विधानसभेत भाजपला प्रवेश मिळवून देणारे ओ. राजगोपाल हे धडाडीचे संघटक व नेते ८६ वर्षांचे आहेत. वाजपेयी मंत्रिमंडळात विविध खाती भूषविलेल्या राजगोपाल यांनी सहा निवडणुकांत पराभवाची चव चाखली होती.
प्रियंका गांधी आगे बढो..
चार राज्यांत पराभूत झाल्याने काँग्रेसमध्ये प्रियंका गांधी यांनी सक्रीय व्हावे, या मागणीला जोर येऊ लागला आहे. हे निकाल लागण्याच्या आदल्याच दिवशी, बुधवारी ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही तशी भावना व्यक्त केली होती.
आसामातला विजय ऐतिहासिक आहे. विकास आणि लोकांच्या आयुष्यात क्रांती घडविण्याच्या भाजपच्या तत्त्वज्ञानाला मतदारांनी हा कौल दिला आहे. सामान्यांच्या विकासासाठी कार्यरत राहाण्यासाठी या निकालांनी पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
लोकांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. विजयी झालेल्या पक्षांचे अभिनंदन. लोकांचा विश्वास परत मिळवेपर्यंत आम्ही अविरत कार्य करीत राहू. या निवडणुकीत जिद्दीने कार्यरत राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार.
– राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष