प. बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांमधील विधानसभांचा आज निकाल
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी सुरुवात होणार असून मतदारांनी कोणाला झुकते माप दिले आहे ते तासाभरातच स्पष्ट होणार आहे. तर या निवडणुकीत कोण बाजी मारणार ते दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तामिळनाडूमध्ये जयललिता, केरळमध्ये ओम्मन चंडी आणि आसाममध्ये तरुण गोगोई आणि पुडुचेरीमध्ये रंगास्वामी यांच्या लोकप्रियतेचा फैसला होणार आहे, पुडुचेरीमध्ये काँग्रेस बाजी मारणार असल्याचे मतदानोत्तर चाचणीतून उघड झाले आहे. मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून मतदानोत्तर चाचण्यांचा कल स्पष्ट करण्यात आला. त्यामध्ये तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर स्पष्ट करण्यात आले तर ईशान्येकडील राज्यात भाजप प्रवेश करणार असल्याचे संकेत देण्यात आले. द्रमुक पुन्हा तामिळनाडूत सत्तेवर येणार असल्याचेही सूचित करण्यात आले आहे, त्यामुळे तेथील निकालांबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. पाच राज्यांमधील या निवडणुकीत एकूण ८३०० उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी निश्चित होणार आहे. त्यामध्ये ममता बॅनजी, जयललिता, तरुण गोगोई, ओम्मन चंडी आणि एम. रंगास्वामी या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा