Om Birla Angry on Rahul Gandhi: बुधवारी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याची तक्रार घेऊन काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. राहुल गांधींना सभागृहातील वर्तनाबाबत समज देऊन अध्यक्षांनी लागलीच कामकाज काही मिनिटांसाठी तहकूब केलं. त्यानंतर राहुल गांधींना त्याबाबत बोलू दिलं जात नसल्याची तक्रार विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. त्यावर आता भारतीय जनता पक्षाकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यामुळेच राहुल गांधींना अध्यक्षांनी समज दिल्याचा दावा केला आहे.

नेमकं काय घडलं दिल्लीत?

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी लोकसभेत राहुल गांधींना वर्तन सभागृहाच्या शिष्टाचाराला धरून ठेवण्यासंदर्भात तंबी दिली. “सभागृहाच्या सदस्यांनी सभागृहाची मर्यादा आणि प्रतिष्ठा जपली पाहिजे. सभागृहातील अनेक सदस्यांचे वर्तन नियम आणि प्रतिष्ठेला धरून नसल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. या सभागृहात पिता-पुत्री, आई-मुलगा, पती-पत्नी असे सदस्य राहिले आहेत. प्रत्येकाने नियम आणि परंपरा जपलीच पाहिजे. विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतः नियमांचे पालन करून आदर्श घालून दिला पाहिजे. सर्व सदस्यांनी नियम ३४९ नुसार आपलं वर्तन ठेवायला हवं”, असं ओम बिर्ला म्हणाले.

अमित मालवीय यांनी शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी गुरुवारी एक व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सभागृहात नेमकं काय घडलं? ते दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी त्यांची बहीण व खासदार प्रियांका गांधी यांच्या हनुवटीला हात लावून नंतर त्यांचा हात हातात घेऊन उठण्यास सांगत असल्याचं दिसत आहे.

राहुल गाधींचं टीकास्र

ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना सुनावल्यानंतर लागलीच सभागृह काही मिनिटांसाठी स्थगित केलं. त्यामुळे राहुल गांधींना बोलण्याची संधीच न मिळाल्यामुळे त्यांनी नंतर सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला.

“लोकसभा अध्यक्षांनी शिस्तपालनाचे आवाहन केल्यानंतर मला बोलूच दिले नाही. ते उठले आणि निघून गेले. विरोधी पक्षनेत्याला न बोलू देताच अध्यक्ष उठतात आणि निघून जातात. त्यांनी माझ्याबद्दल निराधार विधान केले आणि सभागृह तहकूब करण्याची गरज नसतानाही त्यांनी सभागृह तहकूब केले”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.