भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना इतिहासाची शिकवणी लावण्याची गरज आहे कारण त्यांनी निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलताना इतिहासासंदर्भात अनेक चुकीची माहिती दिली आहे, मोदी म्हणजे खोटी माहिती देणारे ‘फेकू नंबर १’ आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आज येथे केली.
काल रात्री आझादनगर येथे दिग्विजय सिंग यांची येथे प्रचार सभा झाली. त्या वेळी ते म्हणाले, की आजकाल भाजपला मोदीज्वर चढला आहे पण भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांना बारावीत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाचे ज्ञान नाही. भाजपने त्यांच्यासाठी इतिहासाचे योग्य ज्ञान जिथे मिळेल अशी शिकवणी लावण्याची गरज आहे.
मोदी म्हणजे फेकू नंबर १ आहे, असे सांगून दिग्विजय सिंग म्हणाले, की मोदींनी सांगितलेल्या ३०० खोटय़ा गोष्टींची यादी आपल्याकडे आहे व ते या खोटय़ा गोष्टी फेसबुक व ट्विटरवर टाकीत सुटले आहेत.
भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी व केशुभाई पटेल यांच्या संदर्भात ते म्हणाले, की ज्या हातांनी मोदींना राजकारणात पुढे आणले त्यांचेच हात मोदींनी कापले व आता भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्यावर तीच वेळ ते आणणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की त्यांनी विकासाचे मोठे दावे केले आहेत. पण ते फेकू नंबर २ आहेत त्यांचे विकासाचे दावे खरे नाहीत.
चौहान यांचे बंधू नरेंद्र यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबतची एक सीडी आमच्याकडे आहे, पण पोलीस त्यावर तक्रार नोंदवून घ्यायला तयार नाहीत कारण ते मुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत. सत्ताधारी भाजपशी साटेलोटे करून एक हजार मुन्नाभाईंनी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात अयोग्य मार्गाने प्रवेश घेतला, असा आरोपही दिग्विजय सिंग यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा