संधिसाधूपणाचे आणि विश्वासघाताचे आरोप फेटाळून लावत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षावर शुक्रवारी पुन्हा एकदा निशाण साधला. आघाडीचा विस्तार करू न शकणारा नेता कोणत्याही प्रमुखपदी नेमू नका, असे संयुक्त जनता दलाने भाजपला सांगितले होते, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आम्ही भाजपबरोबर कोणताही विश्वासघात केलेला नाही. संधिसाधूपणाचा माझ्यावर होत असलेला आरोप निराधार आहेत. राम मंदिर, समान नागरी कायदा आणि घटनेतील ३७०वे कलम हे विषय स्थगित ठेवण्याच्या अटीवरच संयुक्त जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाला होता. त्याचवेळी आघाडीचा विस्तार करू न शकणारा नेता महत्त्वाच्या स्थानावर नेमू नका, असे आम्ही भाजपला सांगितले होते.
मोदी यांचे नाव न घेता नितीशकुमार म्हणाले, आम्ही आमचा आक्षेप नोंदविला होता. घटक पक्षांना विचारात घेतल्याशिवाय नव्या नेत्याची घोषणा करू नका, असेही सांगितले होते. मात्र, नव्या मॉडेलनुसार त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जावेसे वाटत नाही. भाजप आता मूळ धोरणांपासून दूर गेला असून, त्यांनी नवी भूमिका स्वीकारलीये. गुजरातमधील विकासाचे मॉडेल देशभर उपयुक्त ठरू शकणार नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Story img Loader