Yusuf Pathan Instagram Post : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात शनिवारी मोठ्या प्रमाणात जाळपोळीचे प्रकार घडले. जमावाने केलेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू देखील झाला आहे. यादरम्यान माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांची एक इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये पठाण यांनी काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ते निवांत चहा पिताना दिसत आहेत. या पोस्टवर आता सर्व स्तरातून टिका केली जात आहे. हिंसाचार होत असलेला भाग हा पठाण यांच्या मतदारसंघाचा भाग नसला तरी तो जवळपासच आहे. तसेच या राज्यात हिंसाचार होत असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

युसूफ पठाण यांनी एका इंस्टाग्राम तीन फोटो शेअर केले आेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, “छान दुपार, चांगला चहा आणि शांत परिसर. या क्षणाचा आनंद घेत आहे.” यानंतर लगेच हिंसाचारामुळे मुर्शिदाबाद येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर यावरून टीका करण्यास सुरूवात केली आहे.

भाजपाची टीएमसीवर ठीका

भाजपाने तृणमूलचे खासदार पठाण आणि ममता बॅनर्जी सरकारवर हिंसाचाराला पाठबळ दिल्याचा आरोप केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “बंगाल जळत आहे. उच्च न्यायालयाने आम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे म्हटले आहे आणि केंद्रीय दल तैनात केले आहे. ममता बॅनर्जी अशा राज्य सरकार पुरस्कृत हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत कारण पोलीस गप्प आहेत! यादरम्यान खासदार युसूफ पठाण चहा पित आहेत आणि हिंदूंची कत्तल होत असताना आनंद घेतात. ही तृणमूल काँग्रेस आहे.” पठाण यांनी मात्र अद्याप या टीकेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान डाव्या पक्षांच्या समर्थकांनीही देखील युसूफ पठाण यांच्या या पोस्टवर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच संसदेत वक्फ सुधारणा कायदा मंजूर झाला असून याविरोधात देशभरात आंदोलने केले जात आहेत. यादरम्यान उत्तर बंगालमधील मुर्शिदाबाद येथे करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. काल कलकत्ता उच्च न्यायालयाने जिल्ह्यात केंद्रीय सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू युसूफ पाठण बहारमपूर येथील लोकसभेचे खासदार आहेत, हा मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांपैकी आहे. जिल्ग्यात सध्या सुती, धुलया, मससेरगंज आणि इतर काही भागांमध्ये हिंसाचार होत आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात पाच वेळा खासदार राहिलेले अधीर रंजन चौधरी यांचा पठाण यांनी पराभव केला होता.