एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दोन दिवसांपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान बाद होऊन ड्रेसिंग रूमकडे परत जात असताना स्टेडियममधील प्रेक्षकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. काही लोकांनी प्रेक्षकांच्या या कृतीचं समर्थन केलं आहे, तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनीदेखील यावरून प्रेक्षकांना सुनावलं आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे की भारत देश हा खेळभावना आणि आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. आपल्या शेजारच्या देशातील खेळाडूंबरोबर जे घडलं, ते कृत्य खालच्या स्तरावरचं होतं. हे सहन करण्यायोग्य नव्हतं. खेळाच्या माध्यमातून देश एकत्र व्हायला हवा. लोकांमधलं प्रेम आणि बंधूभाव वाढायला हवा. लोकांमध्ये तिरस्कार पसरवण्यासाठी शस्त्र म्हणून खेळाचा वापर केला जाऊ नये.
दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर उदयनिधींची पोस्ट शेअर करत म्हटलं आहे, तिरस्कार पसवणारा डेंग्यू, मलेरियाचा मच्छर विष पसरवण्यासाठी निघाला आहे. नमाज पठण करण्यासाठी सामना थांबवण्याचे प्रकार घडले तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प बसला होता. सृष्टीच्या चराचरात आमचे प्रभू श्रीराम आहेत. बोला जय श्रीराम.
हे ही वाचा >> Nithari Case : देशाला हादरवणारं निठारी हत्याकांड काय होतं? मोनिंदर पंढेर आणि सुरिंदर कोली कसे पकडले गेले?
मोहम्मद रिझवान ड्रेसिंग रूमकडे जात असताना प्रेक्षकांनी दिलेल्या ‘जय श्री राम’च्या घोषणांवर अनेकांनी समाजमाध्यमांवर आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे कृत्य खेळभावनेच्या विरुद्ध आहे. तसेच हे कृत्य एखाद्या खेळाडूला त्रास देणारं असल्याचं मत काहींनी मांडलं. तर काहींचं म्हणणं आहे की, रिझवाननेच याची सुरुवात केली. रिझवानचं मैदानावर नमाज पठणं करणं, क्रिकेटच्या मैदानात इस्रायल-हमास युद्धाचा उल्लेख करणं हेदेखील चुकीचं होतं. रिझवाननेच खेळाच्या मैदानात धर्म आणला.