काँग्रेस लोकशाही नाही तर राहुल गांधींची दोन हजार कोटींची संपत्ती वाचवण्यासाठी आंदोलन करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावल्यानंतर राहुल गांधी आज सक्तवसुली संचलनालय कार्यालयात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात असताना स्मृती इराणी यांनी टीका केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
तपास यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी आंदोलन केलं जात असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी यावेळी केला. बेकायदेशीरपणे कमावलेल्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी राजकीय कुटुंबाने यापूर्वी कधीही तपास यंत्रणांना रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता असंही यावेळी त्यांनी म्हटलं.
नॅशनल हेराल्ड प्रकरण: राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल, कार्यकर्त्यांची रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी
“भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर तपास यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस नेते रस्त्यावर उतरले आहेत,” अशी टीका स्मृती इराणी यांनी केली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, राहुल गांधीही नाही असंही यावेळी त्यांनी म्हटलं.
“१९३० मध्ये वृत्तपत्र प्रकाशित करण्याच्या हेतूने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची स्थापना झाली. ५ हजार स्वातंत्र्यसैनिक त्यावेळी भागीदार होते. पण आता फक्त गांधी कुटुंबाचं नियंत्रण आहे,” असं स्मृती इराणी यांनी सांगितलं.
“कंपनीची मालकी एका कुटुंबाकडे हस्तांतरित करण्यात आली जेणेकरून वर्तमानपत्र प्रकाशित होऊ नये आणि त्याउलट रिअल इस्टेट व्यवसाय करता येऊ शकेल,” असा आरोप स्मृती इराणी यांनी केला.
राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींच्या मालकीच्या अनेक कंपन्यांचे या कंपनीशी संबंध होते असा आरोपही त्यांनी केला.