उत्तराखंडमधील हरिश रावत यांचे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने राजकीय कट रचला होता. पण तो पूर्णत्वास गेला नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.
उत्तराखंडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय म्हणाले, भाजप, मोदी आणि त्यांच्या पाठिराख्यांनी गेल्या ५५ दिवसांमध्ये उत्तराखंडमधील राजकारण आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची आमच्याकडे अधिकृत माहिती आहे. उत्तराखंडमधील सरकार अस्थिरच कसे राहिल, यासाठीच हे पैसे खर्च करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
उत्तराखंडमधील विधानसभेत बहुमत चाचणी होण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत भाजपचे नेते काँग्रेसच्या आमदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना केवळ एकच आमदार त्यांच्याकडे ओढण्यात यश आले. केवळ रेखा आर्य याच भाजपच्या गोटात दाखल झाल्या, असेही उपाध्याय यांनी सांगितले.
भाजपने काँग्रेसच्या काही आमदारांना मुख्यमंत्रीपदाचे गाजरही दाखवले. पण तरीही काँग्रेसच्या आमदारांनी त्याला भीक घातली नाही, असेही ते म्हणाले.

Story img Loader