राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलेलं असताना, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एका कार्यक्रमात विधान केलं. या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखीच चिघळलं. विरोधकांना भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका सुरू केली. एवढच नाहीतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे असंही म्हटलं. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही भाजपावर जोरदार टीका केली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सुधांशु त्रिवेदी यांनी अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवाजी महाराजांबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “राजकारणात एक गोष्ट आणखी असते, काय बोललं त्यापेक्षा महत्त्वाचं असतं कोण बोलत आहेत. मी केवळ एवढचं नम्रपणे सांगू इच्छितो की, हिंदू, हिंदू धर्म, हिंदुत्व आणि भारतीय इतिहासात हिंदुत्वाचे सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराजांबाबत, जर कोणी विचार केला की माझ्या मनात किंचतही अवमान असू शकतो, तर मला असं वाटतं एकतर त्याने स्वत:च्या बुद्धीबाबत विचार केला पाहिजे, स्वत:च्या दृष्टिकोनावर विचार केला पाहिजे.”
हेही वाचा – “छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत पण…”; खासदार अमोल कोल्हेंचं विधान!
याशिवाय “जो प्रश्न विचारतोय त्यालाही महत्त्व असते. कोण विचारत आहे, ते विचारताय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला मानतात का? त्यांनी २६ एप्रिल १६४५ रोजी शपथ घेतली होती की हिंदवी साम्राज्य बनवेन. हे(टीका करणारे) हिंदू साम्राज्य या शब्दाला मानतात का? नाही मानत. त्यानंतर त्यांचे साम्राज्य बनले त्यांचं नाव होतं हिंदूपतपातशाही, यालाही ते मानत नाहीत.” असंही त्रिवेदी म्हणाले.
याचबरोबर “मी विचारू इच्छितो की जो शब्द बोलला नाही त्यावरून तुम्ही(टीकाकार) वाद निर्माण करत आहात. मी विचारू इच्छितो की लुटीयन्स दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने किती रस्ते आहेत. औरंगजेबाच्या संपूर्ण परिवाराच्या नावांवर रस्त्यांची नावे आहेत. बाबर रोड, हुमायू रोड, अकबर रोड, शाहजहा रोड, औरंगजेब रोड, तुम्ही दगडावर काय लिहिलं आणि पुस्तकांमध्ये औरंगजेबाची प्रशंसा व महानता लिहिली. यामुळे मी म्हणतोय की राजकारणात महत्त्व या गोष्टीला आहे की कोण बोलतय.” असं सुधांशु त्रिवेदींनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना सांगितलं.
हेही वाचा – “अनायसे फोन आलाच होता तर…” ; चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला टोला!
“तुम्ही(टीकाकार) तर पुस्तकात त्याला महान लिहिलं, ज्याला क्रुरकर्मा मानलं गेलं. त्याच्या संपूर्ण परिवाराची नावं दगडावर लिहिलीत. आमच्या तर मनात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि हिंदूंसाठी जे केलं होतं तो संपूर्ण विचार त्याच रुपात असतो.” असंदेखील त्रिवेदी यांनी शेवटी स्पष्ट केलं.
सुधांशु त्रिवेदी नेमंक काय म्हणाले? –
राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं होतं.