पीटीआय, बंगळुरू
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकात राजकीय संघर्ष पेटला आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपने मैसुरू, हुबळी आणि बेळगाव येथे निदर्शने केली. तर मुख्मयंत्र्यांनी भाजपची मागणी फेटाळून लावली. तसेच बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील रालोआ सरकार विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांविरोधात सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.
निकालानंतर, अशा प्रकारे चौकशी करण्यास कायद्याअंतर्गत परवानगी आहे हे शोधण्यासाठी आपण कायदेतज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास मागेपुढे पाहणार नाही असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>काश्मीरमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचे मतदान
पत्रकार परिषदेमध्ये सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची भाजपची मागणी फेटाळताना आरोप केला की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार विरोधी पक्षाच्या राज्य सरकारांना लक्ष्य करत आहे आणि सूडाचे राजकारण करत आहे. आपल्याविरोधातील आरोप हा विरोधकांचा आपल्या सरकारविरोधातील कट असल्याचा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी करत ठिकठिकाणी निदर्शने केली. मैसुरू, हुबळी आणि बेळगाव यासह अन्य ठिकाणी निदर्शने केल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाचा निकाल पाहता सिद्धरामय्या यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि तपासात सहभागी व्हावे, अशी मागणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने केली.