कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपाने नेहमीप्रमाणे आपली संपूर्ण यंत्रणा नरेंद्र मोदी या एका नावाला आणखी मोठं करण्यात लावली आहे. मोदी यांना केंद्रस्थानी ठेवूनच यावेळी भाजपा ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांच्या एका विधानानंतर भाजपाने समाजमाध्यांवर ‘मोदी का परिवार’ असे म्हणत विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केलीय.
लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजपाची मोहीम
लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ‘मोदींना स्वत:चा परिवार नाही’, असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर भाजपाकडून विशेष मोहीम राबवली जातेय. भाजपाच्या बड्या नेत्यांनी आपल्या समाजमाध्यमांच्या खात्यावर आपल्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ असे लिहिले आहे. म्हणजे आम्ही सर्वजण मोदी यांच्या कुटुंबातील आहोत, असं म्हणत भाजपाकडून लालूप्रसाद यादव यांच्या टीकेला उत्तर दिलं जातंय.
बड्या नेत्यांनी नावापुढे लावलं ‘मोदी का परिवार’
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री रवीसंकर प्रसाद यांच्यासारख्या बड्या नेत्यांपासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी आपल्या एक्स खात्यावर स्वत:च्या नावानंतर कंसात मोदी का परिवार असं लिहलं आहे.
२०१९ साली ‘मैं भी चौकीदार’
२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी ‘चौकीदार ही चौर हैं’ म्हणत नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर भाजपाने ‘मैं भी चौकीदार’ म्हणत काँग्रेसला उत्तर दिलं होतं. तेव्हा भाजपाच्या जवळपास सर्वच नेत्यांनी आपल्या समाजमाध्यमांच्या खात्यांवर आपल्या नावापुढे ‘मैं भी चौकीदार’ असं लिहिलं होतं. याप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत ‘मोदी का परिवार’ म्हणत भाजपाकडून विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं जातंय.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कदाचित भाजपाकडून मोदी का परिवार या एका ओळीला घेऊनच भारतातील समस्त जनता ही मोदींचे कुटुंब आहे, अशा प्रकारचा प्रचार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर विरोधक भाजपाच्या या प्रचाराला कसं तोंड देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.