काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध हिंदी शायर मुनव्वर राणा यांनी केलेल्या विधानांमुळे मोठी खळबळ उडाली होती. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर मी उत्तर प्रदेश सोडून जाईन, असं ते म्हणाले होते. तसेच, उत्तर प्रदेश आता मुस्लिमांना राहाण्यासाठी योग्य ठिकाण नाही, असं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून मोठी चर्चा झाल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारमधील संसदीय कार्य राज्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी मुनव्वर राणा यांच्या वक्तव्यांवर खळबळजनक विधान केलं आहे. “जो कुणी भारताविरोधी उभा राहील, तो एन्काऊंटरमध्ये मारला जाईल”, असं आनंद स्वरूप म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाज निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले आनंद स्वरूप?

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार मुनव्वर राणा यांच्या विधानाच्या संदर्भात आनंद स्वरूप यांनी हे विधान केलं आहे. “सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणा हे त्या लोकांपैकी एक आहेत जे १९४७ नंतर झालेल्या फाळणीनंतर भारतात राहिले आहेत आणि देशात फूट निर्माण करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्यासारख्या लोकांनी उत्तर प्रदेशच नाही, तर हा देशच सोडून जायला हवं. अशा परिस्थितीमध्ये जो कुणी भारतविरोधी उभा राहील, तो एन्काऊंटरमध्ये मारला जाईल”, असं ते म्हणाले आहेत.

 

“उत्तर प्रदेश आता मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नाही”

मुनव्वर राणा म्हणाले होते…

पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यासाठी भारतातील या मोठ्या राज्यातील सर्वच पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत योगी आदित्यनाथ युती करणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना त्यावर मुनव्वर राणा यांनी टीका केली होती. “मुस्लीम ओवैसीकडे गेले आणि निवडणुकीनंतर भाजपाची सरकार येऊन योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी, मुन्नवर राणा उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन“, असं मुनव्वर राणा म्हणाले होते. “सध्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि ओवैसींकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात वर वर भांडतात. मतांचे ध्रुवीकरण करुन त्याचा लाभ भाजपाला मिळवून देण्यासाठी हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील असतात”, असं देखील मुनव्वर राणा म्हणाले होते.

Story img Loader