देशभरात सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये येत्या १० फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले असून त्यातच आता अजून एका राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. इथल्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांना खाली खेचून भाजपाचं सरकार स्थापन झाल्याशिवाय एक वेळचं जेवण घेणार नाही, असा पणच केला आहे.
पंजाबमधून काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी भाजपानं सर्व ताकद पणाला लावली असताना आता राजस्थानमध्ये देखील काँग्रेस सरकारविरोधात भाजपानं शड्डू ठोकले आहेत. राजस्थानमध्ये पुढील वर्षी २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यामध्ये काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी भाजपानं आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशमधील अलिगढमध्ये एका प्रचारसभेत बोलताना राजस्थानच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी चक्क एक वेळचं जेवण सोडण्याची घोषणा केली आहे!
भाजपाची सत्ता स्थापन होईपर्यंत…!
“मी शपथ घेतली आहे की जोपर्यंत राजस्थानमधील शेतकरी विरोधी आणि युवाविरोधी काँग्रेस सरकारला पायउतार करून भाजपाचं सरकार स्थापन करत नाही, तोपर्यंत मी रात्रीचं जेवण करणार नाही. डोक्यावर पगडी घालणार नाही. २०२३पर्यंत माझी ही शपथ कायम राहील”, असं राजस्थानचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले आहेत.
“आम्हाला पूर्ण विश्वास आहे की २०२३मध्ये भाजपा मोठ्या बहुमतानिशी राजस्थानमध्ये सरकार स्थापन करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकाभिमुख योजना आणि सक्षम नेतृत्वासह भाजपा सरकार बनेल”, असं देखील पुनिया म्हणाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पुनिया उत्तर प्रदेशमध्ये भाजपासाठी प्रचार करत आहेत.
उत्तर प्रदेश: नेत्यांना कोट्यावधी रुपये देण्याच्या तयारीत असणाऱ्या ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी
काँग्रेसचा पलटवार!
दरम्यान, पुनिया यांनी केलेल्या घोषणेवर काँग्रेसनं देखील पलटवार केला आहे. “पुनिया यांना जेवू घालण्यासाठी किंवा त्यांना पगडी घालण्यासाठी इथल्या लोकांचा कोणताही आग्रह नाही. असं बोलणं हे उर्मटपणाचं लक्षण आहे. त्यांनी लोकांसाठी काहीही केलेलं नाही, त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही”, अशी प्रतिक्रिया राजस्थानमधील कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खचारियावास यांनी दिली आहे.