नवी दिल्ली : भाजपच्या उत्तरेतील बालेकिल्ल्याचा बुरूज पाडण्यात काँग्रेस वा ‘इंडिया’ आघाडीला यश मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे बहुमताचा २७२चा जादुई आकडा भाजपला उत्तरेतील राज्यांतूनच गाठता येऊ शकेल.
उत्तरेतील १२ राज्यांना कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि आसाम ही तीन राज्ये जोडल्यास ३४८ जागांवर ‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेस वा घटक पक्षांशी भाजपने थेट लढाई लढली आहे. त्यापैकी सुमारे २८० जागा भाजपच्या पदरात पडू शकतील तर, ‘इंडिया’ आघाडीला सुमारे ६८ जागा मिळू शकतील, असा चाचण्यांचा अंदाज आहे.
केरळमध्ये भाजपने जागांचे खाते उघडले आणि तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली तर भाजप स्वबळावर सहजपणे ‘साडेतीनशे पार’ होऊ शकेल, असे चाचण्यांमधून दिसते.
हेही वाचा >>>भाजप आघाडी ३५० पार; मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅट्ट्रिकचा अंदाज
भाजपचा भगवा कायम
२०१९ मध्ये गुजरात (२६), हिमाचल प्रदेश (५), उत्तराखंड (४) जागा जिंकल्या होत्या. यावेळीही भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकू शकेल. मध्य प्रदेशमध्ये २८, झारखंड १२, छत्तीसगढ ९, आसाम ९ या जागाही भाजप कायम राखू शकेल. दिल्लीतही भाजप सर्वच्या सर्व ७ जागा जिंकू शकेल किंवा एखादी जागा कमी होऊ शकते.
उत्तर प्रदेश-पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी
पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील ८० पैकी भाजपने ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये किमान १० जागांची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम बंगामध्ये भाजपच्या जागा १८ वरून २६ झाल्या तर ८ जागांची भर पडण्याची शक्यता असेल.
अन्य राज्यांमध्ये भाजपचे होणारे जागांचा संभाव्य तोटा या दोन राज्यांमधून भरून निघू शकतो. उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेस व समाजवादी पक्षाची आघाडी पुन्हा फोल ठरण्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्यांनी दिले आहेत.