ललित मोदी प्रकरणाच्या वादात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे सांगून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावली आहे.
राजे यांना हटवण्याची मागणी काँग्रेसने पुन्हा रेटली असतानाच भाजपचे सचिव श्रीकांत शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, राजस्थानमधील आमच्या सर्वात श्रेष्ठ नेत्या असलेल्या वसुंधरा राजे यांना संपूर्ण पाठिंबा देतो. काँग्रेस आमच्या लोकप्रिय नेत्यांना लक्ष्य करत असली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शर्मा यांनी हे ठाम विधान केले. ‘रालोआ सरकारमधील कुणीही कलंकित नाही’, असे रविवारी म्हणणाऱ्या जेटली यांनी या वादाचे कायदेशीर आणि राजकीय परिणाम यासह वेगवेगळ्या पैलूंबाबत पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे कळते.
अरुण जेटली यांनी नंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. वसुंधरा राजे आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर विरोधक चढवत असलेल्या जोरदार हल्ल्याची धार कमी करण्यासाठी पक्षाचे धोरण काय असावे याबाबत या दोघांनी सविस्तर चर्चा केल्याचे कळते.
राजे यांनी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्या इमिग्रेशन अपिलासाठी मदत केलेली असली, तरी त्यांनी याबाबत मोदी यांच्यावतीने साक्ष दिलेली नाही आणि त्यामुळे भारतातील आर्थिक गुन्ह्य़ांमध्ये हव्या असलेल्या व्यक्तीला त्यांनी पाठिंबा दिल्याची विरोधकांची टीका चुकीची आहे, अशी भूमिका भाजपने आज घेतली. ‘त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन साक्ष दिली काय?- नाही. त्यांच्यावतीने अंतिमत: कोणतीही कृती करण्यात आली नाही’, असे भाजपचे प्रवक्ते नलीन कोहली म्हणाले. राजे यांचे विधान वैयक्तिक नात्याने २०११ साली तयार करण्यात आले; राजस्थानातील विरोधी पक्षनेत्या म्हणून नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा