गेल्या काही दिवसांपासून रुपयामध्ये सातत्याने घसरण होत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ‘रुपया घसरत नसून, डॉलर मजबूत होत आहे’, असं निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत असून भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनीही घरचा आहेर दिला आहे.
“रुपया घसरत नाहीये, तर डॉलर मजूबत होतोय,” निर्मला सीतारामन यांचे विधान
मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुपयाचे मूल्य तब्बल ८३ पैशांनी घसरले होते. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वात मोठी पडझड होती. मागील काही दिवसांपासून रुपयाची सातत्याने पडझड होत असताना निर्मला सीतारामन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रूपया घसरत नसून डॉलर सातत्याने मजबूत होत आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. रुपयाची पडझड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
सुब्रहमण्यम स्वामी यांचा टोला
सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं असून निर्मला सीतारामन यांना टोला लगावला आहे. त्यांनी निर्मला सीतारामन यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये “आम्ही सामना हारलो नाही, तर विरोधी संघ जिंकला” असं लिहिलं आहे. सोबत त्यांनी ‘अभिनंदन, जेएनयू कधीच हारत नाही’ असाही टोला लगावला आहे.
निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं आहे?
आगामी काळात रुपयासमोर कोणकोणती आव्हानं आहेत? तसंच या आव्हानांना तोंड देण्यासाठी कोणकोणत्या उपायोजना करण्यात येत आहेत? असा प्रश्न सीतारामन यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “रुपया घसरत नाहीये तर डॉलर सातत्याने मजबूत स्थितीत पोहोचत आहे. इतर चलनांच्या तुलनेत भारतीय चलनाने चांगली कामगिरी केली आहे. अस्थिरतेला तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्न करत आहे,” असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.