लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुस्लीमबहुल लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादीने अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे महायुतीत आठ ते नऊ जागा मिळाव्यात, असा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीला एक जागा राज्याबाहेर सोडण्यात आली आहे.
लक्षद्वीपमध्ये भाजप राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करीत असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी दिली. लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीचे मोहम्मद फैझल हे खासदार आहेत. पक्षातील फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा ठोठावल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने गेल्या वर्षां फैझल यांना खासदार म्हणून अपात्र घोषित केले होते. केरळ उच्च न्यायालयाने खासदार फैझल यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यावरही लोकसभा अध्यक्षांनी सुमारे दोन महिने त्यांची अपात्रता रद्द करण्याचे टाळले होते. फैझल यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी तेव्हा भाजपने केली होती. तसेच स्थानिक पातळीवर भाजप सरकारने नियुक्त केलेले प्रशासक प्रफुल्ल पटेल आणि खासदार फैझल यांचे अजिबात पटत नाही.
राष्ट्रवादीने महायुतीत आठ ते नऊ जागांचा आग्रह धरला आहे. पण भाजप पाचपेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्याबाहेर एक जागा राष्ट्रवादीला सोडून अजित पवार गटाला तेवढाच दिलासा दिला आहे. मुस्लीमबहुल लक्षद्वीपमध्ये भाजपची फारशी ताकद नाही. यामुळेच पक्षाने उमेदवार उभा करण्याचे टाळले असावे. यापेक्षा मित्र पक्षाला पाठिंबा दिला आहे.