समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन नरेश अग्रवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच वादाला सुरुवात झाली आहे. नरेश अग्रवाल यांनी जया बच्चन यांच्यासंबंधी केलेले वक्तव्य भाजपाने लगेचच फेटाळून लावले आहे तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टि्वट करुन त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

नरेश अग्रवाल यांच्या भाजपा प्रवेशाच्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जया बच्चन यांचा बॉलिवूडमध्ये डान्स करणाऱ्या असा उल्लेख केला. ज्यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय आणि डान्स केला त्यांच्याशी माझी तुलना केली असे वादग्रस्त विधान अग्रवाल यांनी केले.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लगेचच टि्वट करुन त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. नरेश अग्रवाल यांचे भाजपामध्ये स्वागत आहे पण त्यांनी जया बच्चन यांच्यासंबंधी केलेले वक्तव्य अयोग्य असून ते कदापि मान्य होणार नाही. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पक्षाची भूमिका मांडताना सांगितले कि, भाजपा सर्व क्षेत्रातील लोकांचा आदर करतो त्यांचे राजकारणात स्वागत आहे.

राज्यसभेतील उत्तर प्रदेशमधील जागेसाठी समाजवादी पक्षाने जय्या बच्चन यांना उमेदवारी दिली. नरेश अग्रवाल यांना डावलून समाजवादी पक्षाकडून जया बच्चन यांना उमेदवारी देण्यात आली होती. जया बच्चन यांच्या उमेदवारीसाठी शिवपाल यादव यांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे नरेश अग्रवाल नाराज होते. अखेर त्यांनी सोमवारी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. मी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपात प्रवेश केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत रेल्वेमंत्री पियूष गोयल व अन्य भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना गोयल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मला एका अभिनेत्रीच्या रांगेत नेऊन बसवले. माझे तिकीट कापण्यात आले. मला ते अयोग्य वाटले, भाजपात प्रवेश करताना माझी कोणतीही अट नव्हती. मी राज्यसभेचे तिकीट मागितलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader