भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे खासदार राम जेठमलानी यांना अखेर अलीकडच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाने निलंबित केले आहे. सीबीआय संचालकांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर भाजपने घेतलेल्या भूमिकेला विरोध केल्याने त्यांच्यावर बेशिस्तीच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
राम जेठमलानी हे प्रतिष्ठित वकील व राज्यसभेचे खासदार असून त्यांनी अलीकडेच पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. गडकरी यांच्या पूर्ती समूहावर झालेल्या आरोपांच्या प्रकरणात त्यांनी गडकरी यांच्यावर टीकाही केली होती. सीबीआय संचालकपदाच्या नियुक्तीवरून भाजपने घेतलेल्या भूमिकेवर टीका केल्यानंतरही जेठमलानी विचलित झालेले नसून त्यांनी म्हटले आहे की, कुणाचीही आपल्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत नाही. सीबीआयचे नवनियुक्त संचालक रणजित सिन्हा यांच्या नियुक्तीवर भाजपने टीका केली होती त्यामुळे जेठमलानी यांनी त्यावर हल्लाबोल केला होता त्यामुळे भाजप नेतृत्व त्यांच्यावर नाराज होते. भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले की, सीबीआय संचालकांची नेमणूक तूर्त बाजूला ठेवावी, अशा आशयाचे जे पत्र विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज व अरूण जेटली यांनी पंतप्रधानांना पाठवले त्याला राम जेठमलानी यांनी विरोध केला होता. त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसलाच मदत होणार आहे व ही बेशिस्तीची कृती असल्याने जेठमलानी यांना निलंबित करण्यात येत आहे. स्वराज व जेटली यांनी पाठवलेल्या पत्राला विरोध व आपल्याविरोधात कुणी कारवाई करू शकत नाही, असे मुंबईत केलेले वक्तव्य या दोन गोष्टींमुळे त्यांच्यावर कारवाई केली गेली, असे त्यांनी सांगितले. जेठमलानी यांनी केलेले वक्तव्य व आज केलेली विधाने यांचा विचार करून  भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांना निलंबित केले. भाजप संसदीय मंडळाची बैठक उद्या सायंकाळी साडेचार वाजता होत असून त्यात निलंबनावर पुढील कार्यवाही केली जाईल, कारण जेठमलानी हे विद्यमान खासदार आहेत.

Story img Loader