काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या अज्ञातवासात आहेत. १९ एप्रिलला भूसंपादन विधेयकाच्या विरोधात होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत विचारले असता भाजप ते खरोखच सहभागी होतील काय असा प्रतिसवाल माध्यमांना केला.
राहुल खरोखरच पुन्हा सक्रिय कधी याची काहीच माहिती नाही. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी याबाबत काहीही वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. राहुल जेव्हा प्रत्यक्ष येतील तेव्हाच काय ते बोलू, असे सांगत भाजपने राहुल यांची खिल्ली उडवली.
महिन्याहून अधिक काळ लोटल्यावर राहुल नेमके कोठे आहेत हे काँग्रेस नेतेही सांगू शकलेले नाहीत. लोकसभा निवडणुकील दारुण पराभवानंतर पक्षाची भावी रणनीती आखण्यासाठी ते सुटीवर असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातही ते गैरहजर राहिले.
संसद अधिवेशनाच्या उत्तरार्धाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांचा हा मेळावा होणार आहे. सर्वच विरोधकांची एकजूट असून भूसंपादन अध्यदेशावरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे या मेळाव्याचे महत्त्व आहे.
आजपासून बैठक
भाजप सत्तेत आल्यानंतर प्रथमच तीन व चार एप्रिलला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्यापूर्वी गुरुवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बैठकीचा मसुदा ठरवण्यात आला. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाल्याचा दावा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीत केला. भाजपचे दहा कोटी सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बैठकीचे उद्घाटन करतील. बैठकीत दोन ठराव संमत केले जातील. यामध्ये सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला जाईल, तसेच मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले जाईल. दुसरा ठराव पररराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर मोदी सरकार यशस्वी ठरल्याबद्दल कौतुक करणारा ठराव असेल.