आपल्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि उद्योगपती रॉबर्ट वढेरा यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या हरयाणा आणि राजस्थानच्या राज्य सरकारने वढेरा यांच्या जमीन खरेदी प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे. त्याबाबत वढेरा म्हणाले की, माझ्याबाबतचा दृष्टिकोन इतका पूर्वग्रहदूषित झाला आहे की, लोक माझी वैयक्तिक ओळख मान्यच करत नाहीत. तसेच मला एखाद्या स्वतंत्र नागरिकाप्रमाणे व्यवसाय करता येईल याचा विचारच होत नाही. माझ्याकडे सतत काँग्रेस नेत्यांशी असलेल्या नातेसंबंधांच्या भिंगातूनच पाहिले जाते आणि माझ्या प्रत्येक गोष्टीचा संबंध राजकारणाशी जोडला जातो. माझ्याविरुद्धची चौकशीही अशाच राजकीय सूडभावनेतून होत आहे आणि मला विनाकारण लक्ष्य बनवले जात आहे, असे वढेरा यांनी सांगितले.
वढेरा यांच्या कंपनीने हरयाणात काँग्रेसचे भूपिंदरसिंग हुडा यांचे सरकार असताना गुडगावजवळील चार गावांमध्ये व्यावसायिक वसाहती बांधण्यासाठी जमीन खरेदी केली होती. त्यात घोटाळा झाला असल्याच्या संशयावरून नंतर सत्तेवर आलेल्या भाजपच्या मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने न्यायमूर्ती एस. एन. धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल लवकरच सादर होईल, असे खट्टर यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्याबरोबरच वढेरा यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली असल्याचेही वृत्त होते. त्यावर वढेरा यांनी सांगितले की, आपल्याला अद्याप नोटीस मिळाली नसून राजकीय सूडभावनेतून आपल्याला त्रास दिला जात असल्याचा त्यांनी आरोप केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp taking revenge from me robart wadra