भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना उतावळा संबोधल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते अक्षरश: तुटून पडले आहेत. रविवारी मोदींनी टीका केल्यानंतर आज नितीशकुमार यांनी प्रतिहल्ला चढविला. त्यावरून संतप्त भाजप नेत्यांनी नितीशकुमार यांना सोयीस्कर धर्मनिरपेक्ष नेता असा टोला हाणला आहे. मोदींवर टीका करताना त्यांनी इंडियन मुजाहिद्दीनचा साधा उल्लेखही केला नाही, याकडे लक्ष वेधत रविशंकर प्रसाद यांनी नितीशकुमारांना लक्ष्य केले.
राज्यसभेतील उपनेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, नितीशकुमार आता जणू काँग्रेसचे नेते असल्यासारखे बोलत आहेत. पण जेव्हा जेव्हा काँग्रेसने अशा भाषेचा वापर केला तेव्हा तेव्हा त्यांचा पराभव झाला होता, हे नितीशकुमार यांनी विसरू नये. इंदिरा गांधी यांनीदेखील अशीच जहरी टीका केवळ सूडबुद्धीने विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केली होती. परिणामी १९७७ मध्ये त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता. मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या विकासकामांवर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. भाजप उपाध्यक्ष मुक्तार अब्बास नकवी म्हणाले की, नितीशकुमार करीत असलेले राजकारण जेपी-लोहियांच्या विचारधारेला साजेसे नाही.